Sunday, 3 January 2016

वाघोबावाघोबा at ताडोबा भाग - ५

आज कोअर झोनची सफारी. मागिल भागात सांगितल्यानुसार , ५ वाजताच उठून सफारी गेट बदलून घेण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी गेलो . तिथे counter वर असलेल्या मैडमनी लगेच पावती दिली , शिवाय  photography लेन्सचे पैसे भरले. २५० mm जास्त मोठ्या लेन्स असल्यास २५० रु . भरावे लागतात , फक्त  कोअर झोन साठी . हा नियम मला थोडा विचित्र वाटला , पण शासनाचे काही नियम हे असेच आतर्क्य असतात. सफारी जीपवाले लवकरच आले होते . तिसर्या , चौथ्या  नंबरवर आमच्या गाड्या होत्या. सुदैवाने आम्हाला कालचाच driver मिळाला , म्हटले चला …. नशीब चांगलाय , आम्ही काल जसे तसेच बसलो , कालच्या लकी सीटवर . उगाच कालच्या लकी setup  मध्ये काही बदल नको . बरोबर ६.३० वाजता आम्ही आंत शिरलो. गाईडच्या सल्ल्यानुसार गाड्या वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागल्या . जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसा एक बदल जाणवला , बफरच्या मानाने जंगल कमी घनदाट होतं . थोडं आश्चर्यच वाटलं . जास्त मोकळं  , गवताळ आणि वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणारं .


 थोड्याच वेळांत , गाईडने गाडी थांबवायला सांगितली , "बघा , वाघाच्या पायाचे ठसे . ताजेच दिसतायत , म्हणजे नुकताच इकडुन गेलेला दिसतोय . "


लगेच आम्ही  त्याच्या मागावर निघालो , गाईडच्या त्याच्या अनुभवाने संभाव्य ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली . वाघाच्या मागावर असतांना वाटेत आम्हाला बऱ्याच प्राणी , पक्षांनी दर्शन दिले .जवळजवळ ३ तास , २५ - ३० किमी फिरलो जंगलात . वाटेत भेटलेल्या सगळ्यांच म्हणणं एकच , "नाही " . गाईडच्या  म्हणण्यानुसार जास्तीत जास्त ८. ३० पर्यंतच वाघ दिसण्याचा चान्स असतो . आता ९.३० वाजत आले होते . आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो आणि १० पर्यंत बाहेर आलों . ठीक आहे , अजून दुपारची एक सफारी बाकी होती .

दुपारी पुन्हा एकदा दुप्पट उत्साहाने आम्ही आमच्या शेवटच्या सफारीवर निघालो . मनोमन प्रार्थना करत होतो " देवा , शेवटची सफारी आज , दिसू दे परत आज वाघ ."
प्रवेश केल्याकेल्या मुंगुसाने दर्शन दिले . "नशीब चांगलंय आज ." - इति गाईड. चला सुरुवात तर चांगली झाली .


थोडं पुढे आलों , तर रानगवा अगदी पोझ देऊन उभा , मग केलं त्याचं फोटो शूटिंग .


तिथूनच पुढे हे…


आणि  हा front view


एका crossing वर दुसऱ्या एका जीपमधला गाईड म्हणाला "सोनम आताच क्रॉस झाली आणि इकडच्या झाडीत गेलीये , पुढुन बाहेर पडेल . " सोनम म्हणजे माधुरीची मुलगी , आमच्या जीपमध्ये एकदम उत्साहाचे वारे संचारले . गाईड म्हणाला मागे जावे लागेल , पण हा oneway आहे , मग काय driver ने reverse मध्ये गाडी चालवायला सुरुवात केली . आम्हाला म्हणाला "नीट पकडुन बसा . " आणि अक्षरश: ४० च्या स्पीड ने त्याने reverse गाडी मारली . तेव्हा खरंच वाटलं आपण रोहित शेट्टीचा सिनेमा बघतोय , नाही …. प्रत्यक्ष अनुभवतोय . कल्पना करा , जंगलातल्या खडबडीत रस्ता कसल्या , वाटेवरून तो अशी गाडी चालवतोय . सलाम त्या driver च्या कौशल्याला . हा थरार अनुभवायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं .  साधारण ५ मिनिटात आम्ही विविक्षित स्थळी पोहोचलो . अधुनमधून चितळ , माकडांचे call ऐकू येत होते . आम्ही अगदी चिडीचूप बसलो होतो . ह्यावेळेस मी ३०० mm लेन्स लावाली होती कॅमेराला . १० मिनिटं झाली , काहीच हालचाल नाही . होताहोता १५ -२० मिनिटं झाली , आणि काटक्या मोडल्यांचा आवाज आला . आम्ही डोळ्यांत प्राण आणुन त्या दिशेला बघू लागलो .  पण …. काहीच घडले नाही . सोनमने आम्हाला हुलकावणी दिली होती . आम्ही थोडसं निराशच झालो , आणि तिथून निघालो . दरम्यान मला Green Bee Eater  (वेडा राघू ) चे काही छान shots मिळाले . कालपासुन मी प्रयत्न करत होतो , पण मनासारखे नव्हते येत फोटो .


पुढे आलों , एका पाणथळी जागेजवळ  हा दिसला , जाणकारांनी नांव सांगावे ,आणि शेवटी हे मजेत बागडणारे हरणाचे पाडस .....सगळ्यांना निरोप देऊन आम्ही बाहेर आलो , तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता .  उद्या सकाळीच निघणार आम्ही इकडून , मनोमन सगळ्या जंगलाचे आभार मानले खास करुन माधुरीचे . तिने आमची ट्रीप सफल केली  होती .
सकाळी आवरुन , नाष्टा करून ९.००  वाजता आम्ही ताडोबाचा निरोप घेतला आणि औरंगाबादच्या दिशेने कुंच केलं .आमच्यासगळ्या प्रवासांत हा सगळ्यांत मोठा पल्ला , लाडांच्या कारंजाला जेवणाचा ब्रेक घेऊन साधारण ८.०० वाजता आम्ही औरंगाबादला आमच्या हॉटेल वर आलो . I must say , सिंदखेड राजा ते जालना हा संपूर्ण प्रवासातला worst रस्ता होता . अक्षरश: रस्त्याची चाळण झाली होती . नाहीतर आम्ही निदान १-१.५ तास आधीच पोहोचलो असतो . असो .

दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उठलो , आज काही घाई नव्हती . चेक आउट करून, उशीराच Brunch करुन बिवी का मक़बरा बघायला आलो. मुलांनी ताज महाल बघितला असल्यामुळे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडला , "हा तर ताज महाल सारखाच आहे . "  आम्हालाही प्रथम दर्शनी तसेच वाटले . पण नाही , खूप फरक आहे . आणि आता हा ताज चा फोटो पहा  ,  आमच्या आग्रा ट्रीप मध्ये काढलेलाफरक लगेच लक्षात येईल तुमच्या , शिवाय ताज सारखा हा संपूर्ण संगमरवरात बनवलेला नाही . असो. एक दीड तास इथे आणि नंतर पनचक्कि परिसरात घालवल्यानंतर आम्ही पुणे रस्त्याला लागलो . वाटेत अहमदनगरला Cavalry Tank Museum ला भेट दिली . आशिया खंडामधले एकमेव  असलेले ह्या संग्रहालयात ५० पेक्षा जास्त तोफा , रणगाडे आणि इतर युद्धात उपयोगी पडणाऱ्या गाड्या ठेवल्या आहेत . अगदी पहिल्या विश्वयुद्ध पासून ते १९७१ च्या भारत पाक युद्धा पर्यंत .

एक झलक

 


तिथुन निघून आम्ही ८.०० वाजेपर्यंत पुण्याला घरी पोहोचलो. पुन्हा एकदा माणसांच्या गर्दीत  आणि कॉंक्रीटच्या जंगलांत .  नेहेमीप्रमाणेच याही ट्रीपने बरंच काही शिकवलं .  मुख्य म्हणजे निसर्गात राहायला , Wifi/इंटरनेट  शिवाय राहायला शिकवलं .  अशीही १६०० किमी प्रवासाची , व्याघ्र दर्शनाची कहाणी सफळ संपूर्ण .

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढला .

समाप्त .
 

Thursday, 31 December 2015

वाघोबा at ताडोबा भाग - ४

थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच  टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर  झोन. नावाप्रमाणेच कोअर  झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे  वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा  कोअर  च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर  हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते . कोअर  सफारी साठी आधीच आरक्षण करावे लागते . दोन्ही ठिकाणी सकाळी ६.३० (उन्हाळ्यामध्ये ६.००) आणि दुपारी ३.०० वाजता मर्यादित गाड्या आंत सोडतात. गाडीत फक्त ६ पर्यटक + १ गाईड + ड्रायव्हर एवढेच प्रवासी. गाडीतून खाली उतरायला बंदी .
ताडोबाला खालील प्रमाणे गेट्स आहेत .
मोहोरली - सगळ्यात जुने आणि लोकप्रिय . बाहेर भरपूर Resorts , हॉटेल्स. MTDC चे गेस्ट हाऊस अक्षरश: गेटच्या बाहेर ५०० मि. वर . सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी २५-२७ गाड्या सोडतात . 
कोलारा - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी ९ गाड्या सोडतात . 
नवेगांव - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी १२ गाड्या सोडतात . 
झरी - सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी ६ गाड्या सोडतात . 
ही गेट्स एकमेकांपासुन साधारण ३०-४० किमी अंतरावर आहेत . त्यामुळे आपली  सफारी कोठून आहे हे बघूनच राहण्याची व्यवस्था बघावी . ज्याचा आम्हाला अनुभव आला . असो . 
शेवटी ज्या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उगवला . आम्ही सगळे ५.४५ लाच तय्यार होऊन resort च्या बाहेर उभे होतो . आज आम्ही मोहोरली गेटमधून बफर झोनला जाणार होतो . साफारीवाले आले आणि म्हणाले , (वर सांगितल्याप्रमाणे) गेट वर जाऊन नंबर लावलाय , काळजी करु नका . त्यांना परत यायला साधारण ६.२० झाले , त्यामुळे गेटवर आमची गाडी बरीच मागे होती . गेट मधून जितक्या पुढे असू तितके चांगले कारण गाड्यांच्या आवाजाने नंतर प्राणी सावध होतात आणि जास्त आंत जातात . त्यामुळे जरा नाराजच झालो . तसेही बफर झोन मधेच जाणार होतो त्यामुळे वाघ दिसायची शक्यता नव्हती . मुलांनाही सांगून ठेवले होते , आपल्याला वाघ दिसेलच असं नाही , आपण जंगल बघायला आलो आहोत . एक एक गाड्या पुढे जायला लागल्या . आमचा नंबर आला "Good Morning . मी अजय तुमचं स्वागत करतो ." गाईड च्या ह्या वाक्यांनी आम्ही अगदी चकितच झालो . कितीही झालं तरी एका सरकारी कर्मचार्याकडून अश्या संभाषणाची अपेक्षा नव्हती . आम्ही सुखावलो. चला , निदान जंगलाची माहिती तरी चांगली मिळेल. आत बरेच routes आहेत , आपण कोणत्या रस्त्याने जायचे हे पूर्णपणे गाईड वर अवलंबून असतं . आता तुम्हाला वाटत असेल कि आतमध्ये रस्ते कसे असतील , तर हा फोटो पहा. 


अश्या वाटांवरूनच गाड्या जायला परवानगी , थोडं सुद्धा आजुबाजूस जाऊ शकत नाही . तसेच बरेचसे सगळे रस्ते oneway . जरी आम्ही बफर झोन मध्ये होतो तरीही जंगल अतिशय घनदाट . जंगलाच्या ह्या पहिल्या दर्शनानेच आम्ही खुश झालो . गाईड म्हणाला काल संध्याकाळी बफर मध्ये वाघीण दिसली होती . आमच्या सुद्धा आशा  पल्लवीत झाल्या . तो म्हणाला बफर मध्ये ४ वाघीण आहेत आणि दिसण्याची शक्यता आहे . झालं . मुलं अगदी खुश झाली . पुन्हा त्यांना समजावलं . "दिसेलच असं नाही " सकाळची वेळ आहे , त्यामुळे पाणवठा / तलावाजवळ जाऊ .  एका ठिकाणी अचानक ३-४ गाड्या थांबलेल्या दिसल्या. गाईडने त्या दिशेला गाडी न्यायला सांगितलं . जवळ जाताच समजलं आत्ताच माधुरी पलीकडे गेलीये . माधुरी हि १३-१४ वर्षांची वाघीण .  सोनम , माया अश्या काही प्रसिद्ध वाघिणी हिच्याच मुली . नुकतीच व्यायलेली ३ पिल्लांना जन्म दिलेला . हे ऐकून आम्ही super Excited !!! पण आम्ही सगळ्यांत मागे , कशी काय दिसणार आम्हाला ती . नशिबाला दोष दिला . मी माझ्या कॅमेरा ची लेन्स बदलली ७०-३०० काढून १५०-६०० लावली , म्हटले जास्त झूम उपयोगी पडेल . आम्ही वाट बघत बसलो , अगदी चिडीचूप , अगदी छोटी छोटी हालचाल , पानाची सळसळ ऐकत . अधूमधून चितळ call देत होते , म्हणजे ती नक्कीच इथेच होती . एवढी शांतता होती कि अक्षरश: काटक्या मोडल्याचा सुद्धा आवाज येत होता . सगळे अगदी डोळ्यांत प्राण आणून उजवीकडच्या झाडीत बघत होते , आम्ही सगळ्यांच्या मागे , समोरच्या झाडीत अगदी बारीक बारीक फटी . काही हालचाल दिसतीये का ते बघतोय . अचानक गाईड पुटपुटला "पाय दिसतायत बघा !!!" नाही … आम्हाला नाहीच दिसले . पुन्हा एकदा चुकचुकलो .  का आपण एवढे मागे आहोत ? पुढे असतो तर निदान पुसट का होईना दर्शन तरी झाले असते . अचानक  आमच्या मागे उजवीकडून काटक्या मोडल्याचा आवाज आम्ही लगेच तिकडे बघितले आणि ती बाहेर आली , अक्षरश: आमच्या पासून १५ फुटांवर , इतकी जवळ कि माझ्या लेन्स मध्ये फोकस सुद्धा होत नव्हती .  खरंच सांगतो माझे हात अक्षरश: थरथरत होते . जे बघतोय ते खरंय ह्यावर विश्वास बसत नव्हता.

तिची एन्ट्री

 
उजवीकडून बाहेर पडून ती डाव्या बाजुच्या झाडींकडे निघाली . एक मिनिट सुद्धा झाला नव्हता , मनात म्हणाले "बाई , लगेच नको जाऊ तिकडे." जणू काही तिने ते ऐकलेच … तिने एकदा तिकडे बघितले आणि पुढे चालू लागली .
 
थोडा वेळ सरळ डावीकडून चालत असतांना अचानक ती परत उजवीकडे वळाली . 


 तिथे तिने  'Boundary Marking ' केलं . ईतर प्राणी आणि वाघांसाठी , 'यें मेरा ईलाखा है।'


पुसटसा चेहरा दिसला , पुन्हा मान वळवली तिने . मनात म्हटलं " पलट  , पलट …   सिर्फ एक बार…  " अक्षरश: तिने सुध्दा DDLJ च्या काजोल सारखी मान वळवली …


एक दोन क्षणच … तिने आपल्याला पाहायला आलेला  प्रेक्षवृंद एकदा बघितला आणि  परत मान वळवली.ती उठून पुन्हा चालायला चालली …पुन्हा ती डावीकडे वळली आणि झाडीमध्ये दिसेनासी झाली …हा सगळा खेळ फारतर ५-७ मिनिटांचा . पण तिने एवढी नजर खिळवली होती की मी एवढ्या वेळांत पहिल्यांदाच माझ्या शेजारी बसलेल्या  माझ्या मुलीकडे बघितलं , मागे माझ्या मुलाकडे आणि बायको कडे बघितलं . त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी आज पर्यंत कधीच बघितला नव्हता . थोडं बाजूला बघितलं तर आई बाबांची गाडी . त्यांचेही चेहरे हेच सांगत होते .  काही बोलायची , विचारायची गरजच  नव्हती.  पाच मिनिटांपूर्वी स्वतःच्या  नशिबाला दोष देणारा मी आता सगळ्यांत नशीबवान ठरलो होतो , जणूकाही आम्हाला केवळ आम्हाला दर्शन देण्यासाठी ती आमच्या मागून आली होती . कोणताही अडथळा , कोणी कोणी सुद्धा नव्हते तिथे आमच्या आणि तिच्या मध्ये . थोडा वेळ तिथेच वाट पहिली , वाटलं ती पुन्हा  बाहेर येईल. नाही आली . पण मन तृप्त झालं होतं . साधारण २.५-३  तास जंगलात फिरुन आम्ही बाहेर आलो. ड्रायवर आणि गाईड दोघांचेही आभार मानले , त्यांना बक्षिस दिले . तेही खुश झाले .
आमच्या सफारीचा थोडा गोंधळ झाला होता . आमच्या अजून ३ सफारी (सगळ्या कोअर  झोनच्या) बाकी होत्या , पण आज संध्याकाळी आणि उद्या  सकाळची 'कोअर  झोन' सफरीची एन्ट्री 'झरी गेट' वरुन होती , जवळजवळ ४० किमी दूर . साफारीवाल्यानी सांगितलं कि तुम्ही जर इकडच्या forest officer ला विनंती केली तर ते बदलून देतील . पण एकदम दोन्ही सफारी बदलायला सांगितलं तर होणार नाही , म्हणून आज दुपारी परत बफर आणि उद्या सकाळची बदलून इकडची (मोहोरली गेट ) कोअर  करु असे ठरले. बाकी सगळ्यांना Resort वर सोडून आम्ही (मी , भाऊ ,आणि माझ्या बाईसाहेब) साहेबांना भेटायला गेलो . अश्या कामांसाठी बायकांनी केलेली विनंती सहसा अव्हेरली जात नाही असा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघे काहीच बोललो नाही . साहेब म्हणाले " आधीच बघायचं ना … आता कसं बदलता येईल ? " बायको , "  अहो साहेब , आम्हाला तरी काय माहित ? आम्हाला वाटलं जवळच असेल . मुलं , सिनियर सिटीझन आहे हो बरोबर . please , करून द्या ना change … " बायकोच्या आवाजातले एव्हढे  मार्दव मी प्रथमच ऐकत होतो . मी मला चिमटा काढून पहिला , हा खरंच तिचाच आवाज आहे का ? साहेब " बंर … या उद्या सकाळी बघु…. सोडू " पुन्हा एकदा विजयी मुद्रेने माझ्याकडे बघून तिने आणि आम्ही साहेबांचे आभार मानले आणि resort वर परतलो . आंघोळ , थोडा आराम आणि जेवण करुन दुपारच्या सफारी साठी आम्ही तयार झालो . साधारण ३.०० वाजता पुन्हा एकदा बफर गेट मधून आत शिरलो . विशेष काही दिसले नाही पण अगदी सूर्यास्त झाल्यावर आम्ही बाहेर आलो , तेव्हा जंगलात मिट्ट काळोख आणि रातकिड्यांचा आवाज सुरु झाला होता . तो सुद्धा फार छान अनुभव.


एक अनामिक पक्षी , जाणकारांनी नाव सांगावे 

Giant Spider


 
झाडीतून आम्हाला पाहणारा रानगवा 

आजचा दिवस संपला . वाघ दिसणार नाही असं मनात ठेऊन गेलो होतो कारण बफर मध्ये सहसा दिसत नाहीत . पण मनांत जे असते तसं नसतं . सगळा नशिबाचा खेळ .  उद्या तर कोअर  आहे , म्हणजे अगदी वाघांच्या घरातच जाणार . Can't wait !!!!

क्रमश :

जाताजाता :
  • जंगलात फिरताना शक्यतो भडक  रंगांचे शर्ट उदा . लाल , डार्क ब्ल्यु  घालू नये . हिरवा , मातकट रंग अगदी योग्य . तोंडावर रुमाल आवश्यक , पुढे जाणार्या गाड्यांची खूप धूळ / माती उडते . 
  • जर तुम्हाला wild photography करायची असेल तर , माझ्या अनुभाववरुन , शक्य असेल तर २ कॅमरे जवळ बाळगणे जास्त फायद्याचे . एकाला साधारण २५०-३०० mm ची लेन्स जी प्राण्यांच्या फोटो साठी पुरते आणि दुसऱ्यावर ६०० mm जी पक्ष्यांच्या फोटो साठी उपयोगी . ऐनवेळेस लेन्स बदलणे जवळजवळ अशक्यच . मला वाघाचे सगळे फोटो मोठ्या लेन्स ने काढावे लागले कारण मला वेळच नाही मिळाला लेन्स बदलालायला . जर माझ्याकडे ३०० ची लेन्स लावलेला दुसरा कॅमेरा  असता  तर फोटो काढणे खूप सोपे गेले असते . Camera Rental चा option आहे .  

Monday, 28 December 2015

वाघोबा at ताडोबा भाग - ३

जसजसा माझा Flight चा दिवस जवळ येत होता , तसतशी माझी हुरहूर वाढत चालली होती . एक तर मी जवळपास ६ महिन्यांनी घरच्यांना भेटणार होतो , जरी Skype वर जवळजवळ रोज भेटणं होत होतं तरी प्रत्यक्ष भेटणं वेगळंच . दुसरे म्हणजे ताडोबा खुणावत होता . दरम्यान इतर तयारी सुद्धा जोरात चालू होती . Driving खालोखाल माझा दुसरा शौक म्हणजे Photography . माझ्याकडे ७० -३०० mm ची लेन्स  आहे पण birding साठी ही कमी पडेल असं वाटलं , तेव्हा Reantal लेन्सचा शोध लागला . त्यांच्याशी बोलून Tamron १५०-६०० mm , Nikon head  लेन्स आरक्षित केली . मला हा पर्याय फारच आवडला. स्वस्त आणि मस्त . आता पुणे- शेगांव - ताडोबा- पुणे route नक्की करण्याचे काम सुरु केलं . बर्याच अभ्यासानंतर खालील route नक्की केला .

पुणे- अहमदनगर - औरंगाबाद - जालना - देऊळगाव राजा - खामगाव - शेगांव - वर्धा - वरोरा - ताडोबा (मोहोरली गेट )

ताडोबा (मोहोरली गेट ) - वणी - यवतमाळ - कारंजा लाड - मेहकर - सिंदखेड राजा -जालना - औरंगाबाद - अहमदनगर -पुणे

जवळपास सगळी तयारी झाली होती , अगदी कमीतकमी कपडे (म्हणजे अंगावर नाही , bag मध्ये ) घ्यायचे ठरवून hand bags भरुन झाल्या . जवळपास ५०% महिलावर्ग बरोबर असताना  हे जमवण किती अवघड आहे ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. कमीतकमी सामानाचे नग करण्याचे कारण गाडीत हे सामान मर्यादित जागेत  बसवायचं होतं . गाडीला roof carrier नव्हते , त्यामुळे कमीतकमी hand bags करुन त्या सगळ्या गाडीच्या मागच्या भागात बसवायच्या होत्या .  असो.  मी २२ -२३ तासांचा अतिशय कंटाळवाणा आणि थकवणारा प्रवास करुन १२ तारखेला सकाळी ,७ वाजता पुण्याला आलो . अतिशय दमलो होतो पण मुलांना भेटून थकवा कुठल्याकुठे पळाला . पाडवा असल्यामुळे तेल मालिश करुन आंघोळ केल्यावर तर मस्त ताजतवानं वाटायला लागलं . दुपारी समस्त नातेवाईक मंडळीचे स्नेहसंमेलन , जेवण झालं . बर्याच दिवसांनी सगळे भेटल्यामुळे गप्पा -टप्पा ह्या मध्ये वेळ कसा गेला ते कळलेच नाही . सगळ्यांचे एकच म्हणणे तू आजच आलायस आणि उद्या लगेच इतक्या लांबच्या प्रवासाला निघतोयास . jetlag वगैरे नाही का होणार तुला? सांभाळून जा. सगळ्यांच्या शुभेच्छा आणि निरोप घेऊन घरी आलो . रात्री नीट झोप नाही लागली , असं नेहेमी होतं.  उद्याच्या प्रवासाचाच विचार डोक्यात घोळत होता .

दुसर्या सकाळी गजर होण्याच्या आधीच उठलो . ६ वाजता गाडी मिळणार होती . मी आणि भाऊ zoomcar ने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो ( मोन्दालेना  रोड , कॅम्प) , तर त्या पत्त्यावर सामसुम . ६ च्या आधीच पोहोचलो होतो ,  म्हटले थांबु थोडा वेळ . ६. १५ झाले तरी काही हालचाल नाही . zoomcar च्या customer care ला फोन केला , त्यांच्या म्हणण्यानुसार पत्ता बरोबर होता आणि गाडी तिथे असणे अपेक्षित होत . म्हटले नाहीतर इंडिअन टाईम नुसार ६ म्हणजे अर्धा तास उशीरच समजायचं . वाट पाहू अजुन थोडा वेळ . ६. ३० झाले तरी काही पत्ता नाही . तेव्हा मात्र C.I.D. style विचार आला " कुछ तो गडबड है !" . मागे एक garage होतं , पण गेट बंद होतं . भावाला म्हणणारही होतो " दया दरवाजा तोड दो !" , तेवढ्यात भानावर येऊन  बघितले तर एक watchman दिसले . त्यांना विचारले "काका इकडे zoomcar च्या गाड्या कुठे असतात ?" "zoomcar ? त्या आता इकडे नसतात.  " "पण आम्हाला तर इकडचाच पत्ता दिलाय . " "हो , एक महिन्यापासून इकडे बंद झालं , आता तिकडे समर्थ पोलिस चौकी समोर असतात . " लगेच customer care शी अतिशय 'शांतपणे '  बोललो. त्यांना ह्या गोष्टीचा काही पत्ताच नव्हता , मग शक्य तितक्या हळू आवाजात ओरडून झाले आणि आम्ही नवीन पत्ता शोधायला लागलो . दरम्यान घरुन फोन चालू झाले , हा सगळा घोळ सांगितल्यावर "तरी म्हणत होतो . असं कधी online गाडी बुक होते का ? वगैरे … " सुदैवाने पत्ता लगेच मिळाला , जवळच होता . तिथे पाहतो तर एक जण खुर्ची वर आरामात बसला होता , चौकशी करता एकदम दिवार पिक्चर स्टाईल म्हणाला " तुम लोग मुझे वहाँ  धुंड रहे हो और मैं तुम्हारा यहाँ  इंतझार कर रहा हुं . " हसावे कि रडावे तेच कळेना . मग मी पण विचारलं  " माल कहाँ है ?" त्याने एका दिशेला बोट दाखवलं . There she was !!! माझी dream girl…. sorry  dream car . छान न्हाऊ म्हाकू  घातलेली  ,चमकणारी . Toyota Fortuner ४*४ . फक्त १०,०००/- कि. मि . चाललेली , जुलै १५ ची. माझे हात शिवशिवत होते गाडी चालवायला .

सगळे सोपस्कार आटपून आम्ही घरी पोहोचलो , मुलांचा गाडी बघून एकदम जल्लोष सुरु झाला. मग सामान आणि मुलांना गाडी मध्ये settle करणे सुरु केलं . सामान बिचारं गपगुमान बसलं , पण मुलांना बसवणं एवढं सोपं नव्हतं . एकाला एका जागी बसवावं तर दुसर्याला तीच जागा हवी , तिसरीच वेगळंच म्हणणे . एकदा दोनदा तर अगदी हेरा फेरी style एकाला बसवावं तर दुसरा खाली , त्याला बसवावं तर तिसरी बाहेर असा खेळ  झाला , शेवटी अगदी ठेवणीतला आवाज काढला आणि दर २  तासाने जागा बदल ह्या आश्वासानावर हा तिढा सुटला . गणपती बाप्पाच्या गजरात घर सोडलं , ८. ३० वाजले होते , तब्बल २ तास उशिरा . पल्ला लांबचा होता . शेगांव ४५६ कि. मी .


अखेर तो क्षण आला होता , मी driving seat वर बसलो होतो. कित्येक दिवसांची Fortuner  चालवायची ईच्छा आज पूर्ण होत होती . I must say , I was quite impressed. Accelerator  थोडा जरी प्रेस केला तर लगेच response येत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे road presence. पुण्याच्या traffic मध्ये horn न वाजवता लगेच साईड मिळत होती . एकाच शब्दात सांगायचं तर  RESPECT !!! लवकरच पुणे - नगर रोड ला लागलो .खरंच सांगतो गाडी १२० km /hr च्या खाली ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते . सकाळपासुन काही पोटात गेलं नसल्यामुळे मुलांची आणि थोडीफार आमची आता  कावकाव सुरु झाली होती . नगर रोड वर धाबे/restaurant ची काही कमी नाही , पण आम्ही एका स्वच्छ आणि नीटनेटक्या जागेच्या शोधात होतो . विठ्ठल कामत ची पाटी दिसली . गाडी पार्क केली . counter जवळ जाऊन जे काही बघितलं ते पाहुन टाळकच सटकल. इतकी अस्वच्छता मी कधीच बघितली नव्हती , सगळीकडे माश्या , चिलट . ते बघुन लगेच तिकडून निघण्याचा निर्णय घेतला . हे खरंच विठ्ठल कामत होतं का नुसताच त्याचं नांव आणि फोटो(तोच दाढीवाला , हसरा…) लावला होता ? आणि हे खरंच त्यांच असेल तर इतकी गचाळ कसं असू शकतं असा प्रश्न पडला . दुर्दैवानं फोटो नाही काढला नाहीतर कामतांना पाठवला असता.  असो.  थोड्याच अंतरावर Smile Stone ची पाटी दिसली . खरंतर मागे एकदा आम्ही इथेच थांबलो होतो , पण नांव विसरलो होतो . अतिशय स्वच्छ , reasonably priced food आणि भरपूर पार्किंग. साधारण १०. १५ झाले होते आम्ही नगर पासून २० कि. मी . वर होतो म्हणजे साधारण घरापासून १०० कि . मी . २ तासात . Not bad , considering पुणे सिटी traffic . अर्धा पाउण तासाचा ब्रेक घेऊन , पोट रिकामी आणि भरुन मंडळी परत गाडीत स्थानापन्न झाली . आता सारथ्य भावाकडे होतं . थोडा आराम केला मागे बसून . मुलांसाठी भरपूर चित्रपटांचा stock होता त्यामुळे ती laptop वर मग्न झाली . नगर - औरंगाबाद बाह्य वळण रस्त्याने औरंगाबाद रोड लागलो . ४ लेन्सचा हायवे असल्यामुळे गाडी आरामात १०० - ११० च्या वेगाने चालवणे शक्य होते . औरंगाबाद कधी आले ते कळलेच नाही . बाह्य वळण रस्ता न घेता सरळ शहरातूनच जालना रोड ला लागलो . (बाह्य वळण रस्ता चांगला नाही असे बर्याच ठिकाणी वाचले होते.) साधारण  ३० किमी वर दुपारच्या जेवणासाठी थांबलो . 'अमृतसरी पंजाबी धाबा ' . चांगले reviews वाचल्यामुळे आधीच इथे थांबण्याचे ठरवले होते . दुपारचा १. १५ वाजला होता , म्हणजे १७० किमी आम्ही अडीच तासांत कापले होते आणि एकूण २७०  किमी ५ तासात . Excellent progress. पुढे अजून १९० किमी बाकी होते . मी हिशेब केला साधरण ३ -३.५ तासांत आपण पोचू , म्हणजे इकडून २.०० ला निघून जास्तीत जास्त ६.०० पर्यंत . But I was wrong.

साधारण तासाभराचा ब्रेक घेऊन मी गाडी चालू केली . जालना ओलांडलं आणि देऊळगाव राजा रोड वर वळलो . अचानक गाडीतून मागच्या डाव्या टायर मधून आवाज यायला लागला . लगेच गाडी थांबवून आम्ही बघायला लागलो , बघतो तर टायर मध्ये साधारण बोटभर लांब खिळा , अर्धा घुसलेला . आमचं धाब दणाणलं. खिळा काढल्यावर जर पंक्चर निघालं तर हे धुड jack वर लावणार कोण आणि टायर कोण बदलणार ? हळुहळू तो खिळा काढला . थोडा वेळ अगदी हळू गाडी चालवली , टायर pressure सतत बघत होतो . साधारण १५-२० किमी गेल्यावर लक्षात आलं की टायरला काही झालेलं नाही . पुन्हा एकदा RESPECT !!! जणूकाही काहीच झालं नाही अशी चालली होती गाडी . मी पण मग Accelerator वर पाय ठेवला आणि दामटवली गाडी . पण हाय रे दैवा !!! रस्ता इतका खराब होता कि लवकरच आम्ही रस्तावर नसून नावे मध्ये आहोत असे डोलायला लागलो . रस्ते महामंडळाचे कौतुकच करायला पाहिजे , म्हणजे एकाच वेळेस दोन्ही वाहनांचा आनंद देणे सोपं नाहीये . साधारण ३० किमी नावेतून sorry गाडीतुन प्रवास केल्यावर एकदाचा चांगला रस्ता लागला .  पण ह्या सर्व प्रकारामुळे आम्ही १-१.३० तास गमावला होता . पुढचा प्रवास बर्यापैकी वेगाने करुन आम्ही ७.१५ ला आनंद विहार , शेगांवला पोहोचलो . पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला होता ४६० किमीचा. गजानन महारांजाचे नांव घेतले , त्यांच्यामुळेच हे सगळे जमले होते.

आनंद विहारचं आता online booking होतं , आमच्या  आरक्षित रुम्स आम्हाला लगेच मिळाल्या . थोडं आवरुन दर्शनासाठी निघालो . तिकडुन सतत संस्थानाच्या बसेस असल्यामुळे बसनेच देवळात गेलो . अजिबात गर्दी नव्हती अक्षरश: १० मिनिटात दर्शन झालं. शांतचित्ताने , मनभरुन. ना गडबड ना गोंधळ. इथे शिर्डीशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. असो. थोडावेळ मंदिर परिसरात काढून आम्ही परतलो. शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आवरुन , चहा नाश्ता करुन ९.०० वाजता निघालो. आता लक्ष ताडोबा. ३७५ किमी , साधारण ७ तास.
रस्ता फार चांगला नाही average speed ६० -७० पेक्षा जास्त नाही ठेऊ शकलो. पण रस्त्याच्या दुतर्फा कापुस आणि तुरीची शेती. दुपारचं जेवण वर्ध्याला घेऊन आम्ही साधारण ५.३० ला ताडोबाला आमच्या Resort वर पोहोचलो. प्रवासात काही खास घडले नाही , पण आम्ही आनंदवन वरुन गेलो , तेव्हा एक क्षण वाटलं , थांबावं. पण वेळेचं गणितात बसत नव्हतं . पुढच्या वेळेस नक्की भेट देण्याचे ठरवले. संध्याकाळी Resort वर सफारीवाल्याला भेटायला बोलावलं. तो म्हणाला उद्याचं तुमचं buffer zone चे आहे. आम्ही सकाळी ६.०० पर्यंत येतो तयार रहा. ६.३० ला गेट उघडतं. आता हे Buffer zone , Core zone विषयी नंतर …

अखेर उद्या आम्ही जाणार होतो. ताडोबा …. We are coming !!!

शेगांव च्या वाटेवरचा सूर्यास्त 

ताडोबाच्या वाटेवर 
  

Saturday, 26 December 2015

वाघोबा at ताडोबा भाग - २

सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं  लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला  Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे  - ताडोबा साधारण ७५० किमी . Not Bad , manageable. विकांताला बाईसाहेबांशी बोलताना प्रस्ताव मांडला . पहिली प्रतिक्रिया " वेडा आहेस का? " पहिला धक्का ओसरल्यावर  पुढचे प्रश्न  "इतक्या लांब Drive ? जमणार आहे का ? मुलं आहेत बरोबर  , त्यांना जमणार आहे का? कंटाळतील ती . आई बाबा आहेत . बाबांच्या गुडघ्यांना त्रास होईल इतका वेळ बसून . " झालं … आमच्या फुग्याला टाचणी बसली . मी एवढ्या Bouncers ची अपेक्षा केली नव्हती . बरेच दिवस लांब राहत असल्यामुळे अश्या bouncy / उसळत्या खेळपट्टी वर खेळण्याचा सराव गेला होता . अश्या वेळेस जे होते तेच झाले . शरणागती . "ठीक आहे . जाऊ बसनेच ." मी विषय संपवला . पण डोक्यातून काही जात नव्हते . मला स्वत:ला driving ची भयंकर आवड आहे , त्यातून अशी संधी मी सहजासहजी हातातून घालवणार नव्हतो . मी पुणे चंद्रपूर routes तपासणे चालूच ठेवले होते , रस्ते कसे आहेत  , काय पर्याय आहेत हे बघणे चालूच होते. Then suddenly it  hit me !!! YES !!!

दुसर्या दिवशी आईसाहेबांशी बोलत होतो . नेहेमीचे इकडच तिकडच बोलुन झाल्यावर मी हळूच विषय काढला . मी , "बर्याच दिवसांत शेगांवला जाणं झालं नाहीये ." आई  ," हो ना . तू आता तिकडे आहेस , इकडे आलास तरी गडबडीत असतो , कसं  काय जमणार ?" मी ह्याच क्षणाची वाट बघत होतो . "ह्यावेळेस जाऊ शकतो . आपण आता ताडोबाला जातोच आहोत तर तसं वाटेवरच आहे. " "हो. पण कसं  जाणार ? रेल्वे असती तर जमलं असतं . एक दिवस थांबुन पुढे गेलो असतो . " "अजूनही जमेल . गाडी घेऊन गेलो तर जमेल. " मी म्हटले . दोन तीन क्षण शांतता . "ठीक आहे . चल ठेवतो आता फोन . मिटींगला ला जातोय ." एक दोन दिवसांनी भावाचा मेसेज "Busy आहेस का ?" फोन केला . भाऊ  , "आई म्हणतीये शेगांव जमेल का ह्या trip मध्ये ." YES … मी माझा आवाज शक्य तितका नॉर्मल ठेऊन म्हणालो "असं म्हणतीय का आई ? हम्म … कसं काय जमेल बरं ?" "आई म्हणतीये गाडी घेऊन जायचं का " भाऊ . अवघड असतो हो आवाज नॉर्मल ठेवणे . "हो का ? जमेल की . " मी  म्हटले . "पण आपण already नऊ जण आहोत , त्यातून भाड्याची गाडी घेतली तर Driver ची एक seat जाईल . " मी हळूहळू माझ्या मुद्द्यावर येत होतो . "Self Drive कार घ्यायची का ? ZoomCar ची ? मी बघितालीये site . तू सुध्दा बघ वाटल्यास एकदा . " भावाला हे अपेक्षित नसावे बहुदा . तो पण गडबडला . पण त्याला समजावले कि सहज जमेल . आपण दोघ आहोत आणि ब्रेक घेत घेत चालवू . मोठी गाडी (SUV )घेतली की  गाडी चालवताना Fatigue येणार नाही आणि प्रवास सुद्धा आरामात होईल . ठीक आहे . चालेल म्हणाला . लगेचच ही खुशखबर बाई साहेबांना सांगितली . तिला समजले की मी आई-अस्त्र वापरुन तिला निष्प्रभ केलंय . थोडा फार गोळीबार केला पण ह्यावेळेस मी चिलखत घालून तयार असल्यामुळे फार काही नुकसान न होता मी  ही लढाई जिंकली .

मला hatchback गाडी चालवायचा अनुभव , पण अधुनमधून मित्राची Innova चालवली होती त्यामुळे मला काही problem नव्हता . पण भावाला मोठ्या गाडीचा काही अनुभव नव्हता . त्यामुळे त्याने एक दिवस गाडी rent करून चालवून बघितली . खुश झाला . दरम्यान मी route planning सुरु केलं . TEAM-BHP चा नियमित वाचक असल्यामुळे तिकडूनच सुरुवात केली . पुणे -नागपुर -चंद्रपूर route बद्दल वाचायला सुरुवात केली . मग लक्षात आले की चंद्रपूर साठी नागपूर मार्गे जायची गरज नाही , तसेही आम्हाला शेगांव मार्गे जायचे होते . त्यादृष्टीने नियोजन करायला सुरुवात केली . आता आमचा आधीचा plan बदलावा लागणार होता . आधी आम्ही १५ तारखेला पोहोचून दुपारच्या सफारीला जाणार होतो . पण आता गाडी असल्यामुळे रात्रीचे driving जमणार नव्हते , तेव्हा पूर्ण plan च बदलला. असा .

१३ नोव्हें - सकाळी ६. ३० पुण्याहून प्रयाण  . संध्याकाळी ५. ३० - ६. ०० पर्यंत शेगांव पोहोचणे . रात्री श्री . गजानन महाराज दर्शन . आनंद निवास मुक्काम .
१४ नोव्हें - सकाळी  ९. ०० प्रयाण .  संध्याकाळी ५. ३० पर्यंत ताडोबा पोहोचणे .
१५ , १६ नोव्हें  - ताडोबा . दर दिवशी २ (सकाळ / दुपार ) ह्या प्रमाणे ४ सफारी .
१७ नोव्हें  - ताडोबाहून सकाळी  ९. ०० प्रयाण .  संध्याकाळी ७. ३० - ८. ०० पर्यंत औरंगाबाद पोहोचणे . रात्री औरंगाबाद मुक्काम .
१८ नोव्हें  - औरंगाबादहून सकाळी  १०. ०० प्रयाण . थोडेफार औरंगाबाद दर्शन (बीबी का मकबरा वगैरे ). अहमदनगर मार्गे पुणे रात्री ८. ०० पर्यंत . जमल्यास नगरला Cavalry Tank Museum ला भेट .

रात्री गाडी चालवायची नाही आणि दर २ तासाने एक break असं नियोजन केलं . ह्यामुळे एक दिवस अधिक झाला होता , पण जास्त stress न घेत गाडी चालवणे ठरवलं असल्यामुळे इलाज नव्हता . पण ह्या नवीन plan मुळे एक नवीनच संकट उत्पन्न झालं होतं . ते म्हणजे सफारीचे  (१५ सकाळ) आणि Resort (१४ रात्र) बुकिंग. पुन्हा एकदा बाई साहेबांची मनधरणी सुरु केली . पण ह्या वेळेस मामला कठीण होता , नाही म्हटले तरी मागच्या वेळेचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता . त्यामुळे ह्यावेळेस तोफगोळ्यांना वाटाघाटीनी  उत्तर द्यायचे ठरवले . दिवाळीचा पाडवा जवळ आलाय अशी आठवण करुन दिली , मग काय …. झाला मूड ठीक . "उद्या जाते आणि बघते काही होतंय का " असा वायदा मिळवला . एका आठवड्यात कन्फर्मेशन आले . सगळ्या सफारी आणि resort बुकिंग झालंय . हुश्श … चला सगळं काही जमलं . दरम्यान भावाने गाडी बुक करून ठेवली होती .  Everything is set … कोणी विचारले तर आम्ही आता  अगदी  आत्मविश्वसानाने  सांगू शकत होतो , एकदम  पु. ल. style " १३ नोव्हेंबर ला !!!!"

क्रमश :

जाता जाता - १. ह्या भागात सुद्धा फोटो नाही टाकले , कारण पहिल्या दोन्ही भागात मी trip च्या पूर्वतयारी विषयी लिहिले आहे , त्यामुळे फोटो टाकणे संयुक्तिक नाही वाटले . भरपूर फोटो आहेत जे पुढच्या भागात प्रकाशित करेनच . २. माझे  आणि zoomcar चे  कोणतेही  व्यावसायिक संबंध नाहीत  .


 

Friday, 25 December 2015

वाघोबा at ताडोबा भाग - १

"Hey Rodney , Good Morning."
"Very Good Morning .. Tell me."
"Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks."
"OK , dates?"
"From 10th till 30th . Can  you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ."
"OK.. will let you know by end of day."
"Thank You Rodney."

 Manager बरोबर  वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ...  मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो . संध्याकाळी Manager चा मेल आला . "Go Ahead "... वाह…. लगेच तिकीट काढले . रात्री पुण्याला ही बातमी सांगितली मंडळी खुश झाली .
पुढची गोष्ट म्हणजे काय काय करायचं ह्याचं planning सुरु झालं . मुलांना आणि सौ. च्या शाळांना सुट्टी असल्यामुळे , दिवसांचा प्रश्न नव्हता . दिवाळीचे दिवस झाल्यावर बाहेर जाऊ असे ठरले . पुढचे प्रश्न  , कोण कोण , कुठे , कधी ???
खूप  दिवसांची इच्छा होती की आपण जंगल सफारी करावी . मागे वायनाड ला गेलो होतो तेव्हा जंगल पाहिले होते , पण ती काही खरीखुरी  सफारी नव्हती . विचार सुरु झाल्याबरोबर काही नावं समोर आली , कान्हा , बांधवगड , पेंच , ताडोबा वगैरे … जबलपूर , भेडाघाट , बांधवगड हा plan मस्त वाटला . पाच - सहा दिवसांत होण्यासारखा . घरी बोललो . बायको ,मुलं देखील हो म्हणाली . लगेच आई  , बाबा , बंधुराजां (मु. पो .  मुंबई)  बरोबर  बोलणे झाले . त्यांना देखील बेत पसंत पडला . म्हणजे एकूण सहा मोठे आणि तीन लहान असं  नऊ लोकांच भ्रमण मंडळ तयार झालं . पुढचा प्रश्न म्हणजे कसं जायचं ? रेल्वे / विमान पर्याय . लगेच IRCTC ची आराधना सुरु केली . नवीन नियमानुसार आता चार महिने आधी रेल्वेचं आरक्षण होतं , त्यामुळे ही  लढाई जिंकता येईल की नाही ? हा मोठाच प्रश्न होता . हर हर महादेव !!! बर्याच  पर्याय  आणि प्रयासाने जबलपूरची जायची , यायची तिकिटे मिळाली . हुश्श …. मोठीच लढाई जिंकली होती . पण …. Reservation च्या नादात एका गोष्टीकडे आम्ही लक्षच दिले नव्हते . बांधवगडच्या सफारी ह्या online बुक करता येतात आणि त्या ३ -४ महिने आधी बुक  होतात . हे लक्षात आल्यावर बर्याच Resorts ना फोन लावले आणि बुकिंग साठी विचारले पण ईल्ले … सगळ्यांनी सांगितले आता सफारी नाही मिळणार . सफरीच नसेल तर तिकडे जाऊन काय करणार . शेवटी lifeline घ्यायचे ठरवले . बाईसाहेबाना इथे चौकशी करायला सांगितले . तिथे सुध्दा नकारघंटाच ऐकायला मिळाली , पण त्यांनी दुसरा पर्याय सुचवला . Why not Taadoba ? हम्म … Interesting. पण सफारींच काय?
मिळेल म्हणाले , २ दिवसांत  सांगतो . थोडी धुगधुगी आली . २ दिवसांनी फोन केला , तर अजून नाही कन्फर्म.   अजून २ दिवस थांबा . अरे देवा !!! मी तर बायकोला दगडूशेटला जाऊन यायला सांगितले . २ दिवसांनी सकाळी WhatsApp वर बायकोचा मेसेज  "Safari available" .  YES !!! लगेच रिप्लाय टाकला "बघितली दगडूशेटची कृपा … " तिचं लगेच उत्तर "मी गेलेच नव्हते " … ठीक है . ठीक है. होत असं कधीकधी . १५ ते १७ नोव्हेंबर , ४ सफारी (१५ ला दुपारी , १६ सकाळ / दुपार, १७ सकाळ ) असा बेत ठरला . त्यांनी Resort बुकिंग आणि  सफारी असं package सांगितले , थोडं महाग वाटलं पण जास्त नाही . लगेच advance भरुन कन्फर्म  केलं आणि जबलपूर चे Reservations कॅन्सल केलं . आता परत तोच प्रश्न , कसं जायचं ? ४ पर्याय …

१. रेल्वे ने नागपूर आणि तिथून ताडोबा बाय रोड (३ तास )
२. विमानाने नागपूर आणि तिथून ताडोबा बाय रोड
३. बसने चंद्रपूर . पुणे - चंद्रपूर खाजगी बसेस आहेत .
४. वरीलपैकी कोणताही नाही  …जो आम्ही निवडला .

पुन्हा एकदा IRCTC ची आराधना चालू केली , पण ह्यावेळेस काही फळ मिळाले नाही . सगळ्या गाड्या फुल्ल … फार प्रवास करतात नाही लोकं . मग विमान कंपन्यांची availability बघायला सुरुवात केली . पण दिवस आणि भाडं ह्यांच गणित काही बसेना . ज्यादिवाशीच हवं ते नेमकं महाग . महाग म्हणजे काय च्या काही महाग . आता पर्याय बसचा . सौ. नी चौकशी सुरु केली. सगळ्यांनी सूर लावला अजून खूप अवकाश आहे . इतक्या लवकर काही सांगू शकत नाही . आम्ही समजलो काय समजायचे ते . दिवाळी चे दिवस , भाडं वाढवणार म्हणून आत्ताच काही सांगत नाहीयेत . पण पर्याय नव्हता . Just Wait and Watch .
दरम्यान माझ्या मित्राकडे चौकशी केली , तो नेहेमी पुणे - चंद्रपूर बसने प्रवास करतो . तो म्हणाला दिवाळीच्या दिवसांत हे लोकं खूप लुटतात . ३००० ते ३५०० तिकीट असू शकेल . मी हिशेब केला म्हणजे कमीतकमी ५४०००/- जाऊन येऊन  लागणार . जास्त वाटले . पण काय करणार पर्याय नव्हता .

खरंच पर्याय नव्हता ??  का काही दिवसातच मिळणार होता ?? 
 
 

क्रमश:

Wednesday, 24 December 2014

तो आणि आम्ही


Virat ची Adelaide ची  innings बघितली  ....  १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी  झाली.  आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या .

साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे  दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श  …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय  तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला  ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो.  ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे ,

तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मुले मुली जी भाषा बोलतात ती तुम्हाला नवीन ,तुम्ही गोंधळता … वाटंत हे सगळे आपल्याला झेपणार नाही …   तेव्हाच तुम्ही त्याला प्रथम T .V.  वर बघता , आपल्याच वयाचा  , आपल्या सारखाच एक पण  असामान्य … कारण तो तिकडे पाकीस्तान च्या Fast Bowling न घाबरता तोंड देत उभा असतो. वकारचा एक चेंडू नाकावर आपटला तरी  … पुढचे दोन्ही चेंडू सीमापार करत. पुढच्या सामन्यात अब्दुल कादिर ला फोडून काढत …   तेव्हापासूनच त्याची आणि आपली नाळ जुळते. पुढच्या पूर्ण आयुष्याची . 

दरम्यानच्या काळात केवढे बदल घडतात , Cable T V चा शिरकाव झालेला असतो , One Day क्रिकेट पूर्णपणे रंगीत झालेले असते. तुम्ही  सुधा थोडे stylish कपडे घालायला लागता  , केस सेट करून घेता  , English च्या सरावाच्या नावाखाली 'तसली ' Novels , Magazines वाचायला लागता  .   तो देखील बदलत असतो , Test मध्ये आपली पहिली Century करत , सामना वाचातावत तर One Day मध्ये धुवांधार फलंदाजी करत भारतासाठी सामना जिंकत . आपण आता अधिकच जवळ येत जातो . 

पुढे तुम्ही Engineering ला जाता , घरापासून , ओळखीच्या वातावरणापासून दूर , होस्टेलचे राहाण , खाण , सगळच नवीन . तुम्ही तुमच्या Seniors ला टरकून असता . पण तो खेळत असतो , दूर ऑस्ट्रेलियात . जगातल्या Fastest आणि bounciest पिचवर शतक काढत , World Cup मध्ये पाकिस्तान ला हरवत. 

तुम्ही Engineering ला रुळता ,  submissions , practicals जे इतर करतील तेच copy करता . कोण घेणार डोक्याला ताप .... risk नकोरे बाबा ...  तिकडे तो कलकत्त्याला १ लाख लोकांसमोर साउथ  आफ्रिका  विरुद्ध हिरो कपच्या सेमी-फायनलला ,जेव्हा कोणीच bowling टाकायला तयार नसत , risk घ्यायला तयार नसतं ,तेव्हा स्वतः शेवटची ओवर टाकतो. न डरता … जर का आपण हरलो तर लोकं काय म्हणतील ह्याचा विचार न करता … भारत सामना जिंकतो आणि नंतर हिरो कप सुद्धा . तुम्ही बरेच दिवस त्याच्या जिगरबाज वृत्तीची चर्चा करत राहता. 

दरम्यान ब्रायन लारा  world record करतो , आपल्याला तोसुद्धा आवडत असतो  पण तो सर्वश्रेष्ठ फलंदाज हे मान्य नसतं , तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तासनतास वाद घालता. वेगवेगळ्या ठिकाणी , म्हणजे आपल्यासाठी वेगवेगळ्या पीचवर , चहाच्या टपरी , पानाची गादी ते बियर बार मध्ये . तो मात्र शांत असतो दरम्यान तो आता One Day चा अतिशय स्पोठक  opening batsman झालेला असतो आणि Test चा reliable and prized wicket असलेला २ down batsman . तुमची sixth semester ची Preparation Leave चालू असते , नेहेमीप्रमाणे अडखळत आपला अभ्यास सुरु असतो , तो खेळत असतो तिकडे शारजात , आपल्या रूम वर T V नसतो , आपण एका Electronics च्या दुकाना समोर footpath उभे राहतो , अनेक लोकांसोबत . तो वासिम आणि वकार ची bowling फोडून काढत , ७३ धावांची खेळी करतो , ज्यामध्ये वासिम ला Square Leg ला flick करून मारलेला षटकार असतो .  खरच सांगतो ... त्यावेळेस त्या एका T V समोर १०० - १२५ लोक उभे असतात . अचानक एक फिल्म तुटावी तसा तो बाद होतो, आणि त्या क्षणाला त्या T V समोरूची  गर्दी हटते  , आपण सुधा तिथून हलतो ... भारताचा डाव अपेक्षेप्रमाणे गडगडतो , आपण हरतो .  हे भविष्यात अनेक वेळा घडणार असतं .... 
तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीमध्ये रूळण्याच्या प्रयत्नात असता , अडखळत , घाबरत ... नवीन सहकारी , Boss नावाचा प्राणी ह्यांच्याशी जुळवून घेत असता  , तिकडे तो वानखेडे स्टेडीयम वर एकटाच उभा असतो , Warne , McGrath , Fleming च्या चिंधड्या उडवत .... आख्खं स्टेडीयम त्याच्या नावाचा गजर करतंय , पण  एकच चिंता हा जर का मध्येच बाद झाला तर..... तसंच घडतं ९० धावा काढून तो out होतो ... आपण आपल्यावरच खूप चिडतो… का आपण आपली बसायची position बदलली ... स्टेडीयम रिकामे व्हायला सुरुवात होते , आपण अर्थातच हरतो … हेच पुन्हा Semi Final ला घडते .... तो बाद होतो आणि उरलेले batsman फक्त पीच वर जाऊन परततात .... 

एप्रिल च्या रणरणत्या उन्हाळ्यात तुम्ही दूरच्या कोणत्या तरी छोट्या शहरात office च्या कामानिमित्त आलेले असता , तुम्हाला हॉटेलमध्ये A. C. रूम मिळत नाही , न चालणारा T.V. तुम्ही manager शी भांडून बदलून घेता ..... उकाड्याला वैतागत , शिव्या घालता . तिकडे शारजाला desert storm , त्याच्या Birthday च्या दिवशीची सेन्चुरी , बेंबी च्या देठापासून ओरडणारा Tony Greig.....Warne  ला मारलेली Straight  सिक्स , Kasprowicz  ला परत स्टेडियम च्या  छतावर  मारलेली  सिक्स....  "WHAT  A PLAYER ...... WHAT  A PLAYER ......!!!!" Tony Greig..ने दिलेली उपमा आपल्या डोक्यात घुमत असते ... आता फक्त तोच .... बाकीच्या सगळ्यांना त्याने मागे टाकलेले असते ... तुम्ही मात्र अजूनही करियर मध्ये चाचपडत असता , पुढे काय ह्याचा निर्णय होत नसतो , मध्येच कोणीतरी Henry Olanga त्याला आव्हान देतो , पुढच्याच सामन्यात तो त्याला अक्षरशः बुकलुन काढतो .... तुमचा अहं सुखावतो ... तुम्ही तुमच्या Boss ला काही बोलू शकत नसता. 

तुम्ही Job बदलता , नवीन office मधली एक मुलगी तुम्हाला खूप आवडते , तिच्याशी तुम्ही ओळख वाढवता आणि एके दिवशी हिम्मत करून तिला Propose करता , ती नाही म्हणते ..... तुम्ही कोसळता .... आजारपणाच्या रजेवर जाता ..... चेन्नईला पाकीस्तान विरुद्ध असाच तो एकटाच झुंजत असतो , कोणीच साथ द्यायला तयार नसतो , पाठदुखीने शेवटी हैराण होवून तो बाद होतो , उरलेले batsman राहिलेल्या १४ धावा सुध्दा काढू शकत नाहीत , आपण हरतो , त्याची सर्वोत्कृष्ठ  खेळी वाया गेलेली असते , तो dressing room च्या बाहेर पडत नाही , तुम्ही आख्खा weekend घरात काढता , कोणाशीही न बोलता .... तीने नाकारल्याच्या दुःखापेक्षा हे तुम्हाला जास्त दिवस छळत ..... 

यथावकाश तुम्ही लग्न करता , नव्या नवलाईचे दिवस चालू होतात ...... तुम्ही तीचे मन जपता ..... आज तिला संध्याकाळी बाहेर जायचय , पण तुम्ही तुमच्या lucky खुर्चीतून उठत नाही …. नाही आज नाही , ती चिडते पण तुम्ही बधत नाही .... शोएब आलाय , तुमच्या छातीत धडधडत , पुढच्या क्षणी तुम्ही चित्करता …. त्याने शोएबला स्टेडियम मध्ये भिरकावलेले असते , पुढचे दोन चेंडू सीमापार ..... केवळ ३ चेंडूत त्याने शोएब ची आणि पाकिस्तान ची हवा काढलेली असते …. इथून पुढचा दीड तास तो चौफेर खेळत असतो , ती त्याची One Day मधली आपल्याला  सर्वोत्कृष्ठ  खेळी वाटते , तुम्ही खूप सुखावता , बायकोला घेऊन बाहेर celebrate करता. 

तुमच्या आयुष्यात आता स्थैर्य आलेलं असतं , त्याचाहि खेळ आता बदललेला असतो , खुपसा risk free , तरीही तेवढाच परिणामकारक. तुम्हाला तुमचा Job आवडत नसतो , महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराशिवाय त्याच्यात काही स्वारस्य नसतं , पण तो तिथेच असतो , खेळावरचे प्रेम , निष्ठा एका कणानेही कमी न होता . Bad Patch , Tennis Elbow असूनही तो म्हणतो मला खेळायलाच हवं ,त्याला दुसरेकाही माहितीच नसतं .

तुम्ही नोकरी बदलता , नवीन Job Role ही तुम्हाला आवडेनासा होतो . Late Night calls मुळे रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबव लागते , अशाच एका रात्री हैद्राबादला तो एकटाच Australia च्या ३७५ धावांचा पाठलाग करत असतो , तुम्हाला आता घरी जाऊन T.V  वर त्याला बघावास वाटते , पण आपण जागा बदलली आणि तो Out झाला तर ? तुम्ही तिथेच थांबता , तो १७५ वर Out होतो , भारत हरतो . तुम्ही दुसऱ्या दिवशी sick leave टाकता .

तुम्ही World Cup प्रत्येक चेंडू बघता . त्याची England  , South Africa विरुद्धची शतके , तो  Dale Steyn ला हूक केलेला षटकार , Graeme Swann ला  back to back मारलेल्या Sixes !!! Semi Final मधली Pakistan विरुद्धची अडखळत पण महत्वाची खेळी आणि मग शेवटी मुंबईला उसळलेला विजयाचा उत्सव !!!! पूर्ण team ने त्याला उचलणे आणि सर्वात शेवटी कोहलीचे बोल "एवढे वर्ष त्याने भारतीय क्रिकेट आपल्या खांद्यावर वाहिले आज आमची वेळ आहे त्याला खांद्यावरून न्यायची " त्याने तुमच्या मनातलीच गोष्ट सांगितलेली असते .  सगळीकडे आसवे वहात असतात , तुमच्या गालावर सुद्धा .

आज तुम्हाला वानखेडे वर जायचंय , त्याला शेवटचे खेळताना बघायला . पण तुम्ही जात नाही , त्याला जाताना पाहणं तुम्हाला सहन नाही होणार . तुम्ही घरीच T V वर त्याला बघता , त्याची पुन्हा एकदा भूतकाळात नेणारी त्याची last innings , त्याचे Drives , त्याचे Cuts , त्याचा Backfoot Punch .... सगळं सगळं तुम्ही डोळे भरून पाहता , मनात साठवता  आणि त्याची ती शेवटची exit ..... Pitch ला नमस्कार करून केलेली .... आता मात्र तुम्ही तुमचे अश्रू रोखू शकत नाही . तुमचा मुलगा विचार करतो "ह्यात काय एवढं ? " तुम्ही २६ वर्षांपूर्वी केला होता तसा. तुम्हाला वाटतं आता काहीच उरलं नाही बघण्यासारखं , आपला आत्माच सोडून चालला आहे. तुम्ही काही काळ क्रिकेट बघणं सोडता , भारताच्या परभावाच सुद्धा दुःख होईनासं होतं .

त्याने कधीच म्हटले नव्हते माझ्यावर एवढे प्रेम करा , तरी आम्ही केले . त्याने कधीच म्हटले नव्हते मी out झाल्यावर T.V. बंद करा , पण आम्ही केला . त्याने कधीच  म्हटले नव्हते माझ्यासाठी प्रार्थना करा , पण आम्ही केल्या .  त्याने कधीच म्हटले नव्हते माझ्याकडे Role Model म्हणून बघा , तरी आम्ही पहिले . त्याने कधीच म्हटले नव्हते मला देव म्हणून पुजा , तरी आम्ही पूजले . त्याने कधीच म्हटले नव्हते मी नसण्याने क्रिकेट मधला Charm निघून जाईल , तरी हृदयाच्या कोपऱ्यात आम्हाला वाटले.

खरंच काय होत त्याचं आणि तुमचं नातं ? का ऐवढे प्रेम केलं तुम्ही त्याच्यावर ? कि तुम्ही आणि तो वेगळे नव्हताच? तो तुमच्याच एक भाग होता , तुम्हाला करावाश्या वाटणाऱ्या गोष्टी लिलया करणारा , तुम्ही पाहिलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा. हे काय नातं आहे हे जाणण्यासाठी तुम्ही आमच्या पिढीचे असायला हवेत ,  त्याच्या बरोबरच वाढलेले असायला हवे .

तुम्ही अतिशय सुदैवी आहात . तुम्ही त्याच्या बरोबर वाढलात . Cherish those magic moments !!!<a href="http://www.marathibloggers.net/" target="_blank"><img alt=" मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!" src="http://goo.gl/YckhY"></a>Sunday, 26 October 2014

सफर जंगलाची !!!

 नोव्हेंबर २०१२ family स्नेहसम्मेलन 


नेहेमीप्रमाणे ह्या वर्षी सहलीला कुठे जायचे ह्या प्रश्नावर  चर्चा जोरदार रंगली होती. सुरवात पार युरोप पासून झाली. मग हळूहळू मंडळी Middle East , Asia वर आली. दुबई , अबुधाबी , Singapore , Bankok वगैरे नेहेमीची यशस्वी ठिकाणे चर्चिलि गेली. पर बात कुछ जमी नही. त्यामुळे गाडी काही पुढे सरकली नाही.

नाताळ २०१२ family स्नेहसम्मेलन 


पुन्हा एकदा तोच विषय. पुन्हा तीच यादी , पण ह्या वेळेस मात्र गांभिर्याने आणि realistic (कारण पेय पान सोबतीस ) !! काश्मीर पासून सुरुवात  करुन मध्य भारतात मंडळी पोहोचली. त्याच वेळेस why not Kerala ? असा विचार मनात चमकला . पण नेहेमीच्या जागा सोडून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जावे हा विचार पक्का झाला.
मग offbeat ठिकाणे शोधता शोधता 'वायनाड' नजरेस पडले. Intresting …. अजून शोध घेऊ.

Cut to जानेवारी २०१३ …. 


सर्वानुमते ठिकाण नक्की … 'वायनाड'…. चला एक मोठे काम झाले … आता तारीख ठरवणे … भ्रमण मंडळाच्या तीन famillies नक्की … पण तारीख पे तारीख..  तारीख पे तारीख करता करता शेवटी २३ मे तारीख नक्की ठरली. 
 
२३ मे ते २६ मे असा चार दिवसांचा बेत नक्की झाला . विमान प्रवासाची तिकिटे , राहण्याचे ठिकाण book झाली.
राहण्यासाठी हॉटेल शोधताना एका जंगल resort नजरेस पडले. थेट जंगलात cottages , watch tower , night सफारी अशा आकर्षणे वाचून आणि रेसोर्त चे चांगले review वाचून तेच नक्की केले. नंतरचे काही दिवस detail planning झाले आणि हळूहळू इतर तयारी करता करता प्रवासाचा दिवस उजाडला.

२३ मे  


भ्रमण मंडळ पुणे विमानतळावर हजर. काही मंडळींचा पाहिलाच विमान प्रवास , त्यामुळे मंडळी अतिशय उत्साहात विमानाची वाट बघत होती.  सकाळी पावणे सात चे बंगलोर चे विमान धावपट्टी वर आले आणि आमची सगळ्यांची विमानात चढण्याची लगबग सुरु झाली. आता काही मंडळींना प्रश्न पडेल की  विमानात चढण्यासाठी लगबग करायचे काय कारण ? ह्या प्रश्नाचे उत्तर आम्हा काही मंडळींच्या मुंबई उगमात आहे . आम्हा मुंबईकरांना कोणतेही सार्वजनिक वाहन समोर दिसले कि घाईघाईत त्यात 'घुसणे' हेच माहिती असल्यामुळे थोडा गोंधळ उडाला. पण थोड्याच वेळात अख्खं भ्रमण मंडळ त्यांच्या निर्धारित जागांवर बसून स्थिरस्थावर झाले आणि 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात विमानाने उड्डाण केले. 
साधारण दीड दोन तासांत बंगलोर विमानतळावर आम्ही उतरलो.  तिथून लगेचच आम्ही आधीच book केलेल्या १६ सीटर van ने आम्ही 'वायनाड' च्या दिशेने कूच केले. वाटेत सौथ-इंडिअन पदार्थांवर ताव मारून झाल्यावर आम्ही 'नागरहोले national park '(अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Nagarhole_National_Park) च्या हद्दीवर येउन ठेपलो. आता पुढचा प्रवास थेट national park मधूनच जाणार असल्यामुळे मंडळी अतिशय सावध होऊन बासली. सगळ्यांचे लक्ष गाडीच्या खिडक्यांवर ... जणूकाही वाघ आम्हाला दर्शन देणार होता. असो. अगदी वाघ नाही पण भरपूर हरणं , माकडे (जंगलातली ... गाडीतली नव्हे ) , १-२ गरुड पक्षी मात्र दिसले. 
मंडळी , हा रस्ता मात्र अतिशय सुंदर ... थेट जंगलातून जाणारा , दोन्ही बाजूस गच्च भरलेली हिरवीगार झाडे . मे महिना असूनही नजर जाईल तिकडे हिरवळ. प्रथम दर्शनानेच जंगलाने आम्हाला जिंकले. 
 
FYI.. हा रस्ता रात्री च्या वाहतुकी साठी अतिशय धोक्याचा आहे कारण हत्ती ...  रात्री हत्तीने छोट्या गाड्यांना धडक देऊन पाडल्याची बरीच उदाहरणे आहेत... ही बहुमोल माहिती अर्थातच Driver काकांनी दिली. अर्थात आम्ही हा प्रवास एकदा  रात्री करून ह्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला , पण त्या विषयी नंतर . 
 
 
ही  कोण मंडळी असा भाव चेहेऱ्यावर  ... 
कुतुलाने बघणारी हरणे ... वरील काही प्रातिनिधिक फोटो पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल. 
 
नागरहोले मधून बाहेर पडत नाही तोच , resort मधून phone आणि कुठे आहात ह्या विषयी चौकशी . Manager ने driver ला रस्ता समजावला आणि थोड्याच वेळात आम्ही resort वर पोहोचलो . सलामीलाच resort ची जागा पाहून आम्ही खुश झालो . जंगलातच जागा , त्यांच्या private property ला  elecric fencing केलेलं . त्यामुळे सुरक्षित . सुंदर cottage मध्ये आम्ही check - in केले  आणि थंडगार  लिंबू सरबताने आमचे स्वागत झाले. चला सुरुवात तर मस्त झाली . 
थोडया वेळाने आम्ही resort चा फेरफटका मारायला बाहेर पडलो. आम्ही watch  tower वर पोहोचलो आणि समोरच हत्तींचा कळप येऊन बसलेला दिसला. जंगल मधल्या हत्तींचे हे पहिलेच दर्शन .... चार हत्ती त्यांच्या पिल्लांसह आले होते. आम्ही अगदी चिडीचूप होऊन त्यांना बघत होतो , कारण  हत्ती हा अतिशय बेभरवशाचा , कधी चिडेल आणि हल्ला करेल काही सांगता येत नाही. जरी आम्ही कुंपणात असले तरी कधीकधी हत्ती ते कुंपण तोडू शकतो , त्यामुळे मंडळी थोडीशी भयभीत झालेली, त्यातून एका हत्तीने जोरात चित्कार केला. झालं ... मंडळी तत्काळ watch tower  वरुन खाली उतरली.  पण खरंच त्या हत्तींना पाहून खूपच छान वाटले , शेवटी जंगल का मजा ही कुछ और होता है . अंधार असल्यामुळे आणि no flash अशी सक्त ताकीद असल्यामुळे फोटो काही चांगले आले नाहीत , हाच काय तो हिरमोड झाला . पण सगळ्याच गोष्टी काही आपण कॅमेरात click नाही करू शकत , काही गोष्टी ह्या मनातच click करून ठेवायच्या असतात असं कोणीतरी म्हटल्याचे आठवले (कोणीतरी काय , मीच म्हटले ... ). 
Watch Tower मधून झालेले हत्ती दर्शन 
 
Manager शी बोलणे झाल्यावर आजच night safari चे नक्की केले. रात्री ९. वाजता resort च्याच open jeep मधून निघणार होतो. हा प्रकार मात्र खूप exciting  असणार ह्या बद्दल  आमच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. 
आम्ही सगळे जेवण आटपून जंगल सफारीसाठी  तयार झालो. आमची jeep तयारच होती, आमच्या बरोबर पुढच्या सीट वर एक जण, सतीश , flood light असलेली torch घेऊन बसला . Resort च्या बाहेर पडून आम्ही नागरहोलच्या दिशेने जाऊ लागलो . एवढा  मिट्ट अंधार आम्ही शहरी मंडळी प्रथमच अनुभवत होतो. खूपच थरारक अनुभव , चंद्रप्रकाश आणि जीप च्या head  light शिवाय काहीच उजेड नाही. थोड्याच वेळात सतीश  ने डावीकडे झोत मारला , बघतो तर जीप च्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ फुटावर २ रानगवे (Bison) बसले होते. त्यांनी आपली मान आमच्याकडे वळवली आणि नापसंती दर्शवली.  थोडं पुढे गेलो आणि एक हत्ती रस्ता ओलांडायच्या तयारीत असलेला दिसला , त्याने पायाने माती उकरुन आमच्या उपस्थिती बद्दल नापसंती व्यक्त केली . सतीशच्या म्हणण्यानुसार, हत्तीने आपल्याला warning दिली ,जर आपण अजून थोडा वेळ जरी थांबलो तरी तो चिडेल. त्यामुळे आम्ही लगेचच तिकडून कूच केले. रस्त्याच्या कडेलाच रानगव्यांचा एक कळप बसलेला दिसला . रानगवा हा अतिशय आक्रमक आणि शक्तिशाली प्राणी. प्रसंगी बिबळ्याला  (leopard) सुद्धा शिंगावर घेण्याची हिम्मत दाखवणारा. जोडीला रातकिड्यांचा , भेकारांचा आवाज होताच. अगदी मारुती चितमपल्लींच्या पुस्तकाची आठवण व्हावी असेच वातावरण आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. आजूबाजूला हरणांचे कळप होतेच पण आता आम्हाला त्याचे विशेष अप्रूप वाटत नव्हते.
 
 
एवढ्यात सतीशने Driver ला गाडी offroad घ्यायला सांगितली , त्याच्या म्हणण्यानुसार १-२ दिवसांपूर्वी बिबट्याने एका  झाडावर एक शिकार ठेवली होती जर नशीब असेल तर आपल्याला बिबटा दिसू शकेल . आता मात्र आमच्या कडची बच्चे मंडळी आणि काही मोठी मंडळी थोडी घाबरलीच. पण आमच्या नशिबात बिबटा नव्हताच  त्यामुळे २-३ किलोमीटर गाडी चालवून आम्ही परत मुख्य रस्त्यावर आलो. जवळपास एक तास फिरल्यावर आम्ही परत resort वर आलो. खरंच अतिशय थरारक अनुभव . बच्चे कंपनी थोडी घाबरली असली तरी त्यांनी सुद्धा  खूपच Enjoy केला. 
 

२४ मे  

 
पुन्हा जंगल सफारी, पण सकाळची , थोलापेत्त्य (Tholpetty) जंगल बघायचा plan. सकाळी लवकरच (६. वाजता) आम्ही जंगलाच्या प्रवेशद्वाराशी जाऊन उभे ठाकलो . Jeep बुक केली आणि साधारण ७ वाजता आम्ही जंगलात प्रवेश केला . सकाळचे जंगल बघणे हा सुधा एक वेगळाच अनुभव. कोवळे ऊन अंगावर घेत आजूबाजूच्या झाडा झुडुपात काही दिसतंय का ते बघत आम्ही निघालो, पुन्हा एकदा वाघ दिसेल अशी आशा . पण तो राजा आहे जंगलाचा त्याला वाटेल तेव्हाच तो दर्शन देणार. आमची थोडी निराशाच झाली , पण तेवढ्यात आम्हाला एका झाडावर जगप्रसिद्ध मलबार खार (Malabar squirrell ) दिसली , थोडीफार आपल्या शेकरू सारखीच दिसणारी पण लालसर शेपटाची. सकाळचे कोवळे ऊन खात बसली होती मस्त ... थोडे पुढे जाऊन Kingfisher ने दर्शन दिले. बाकी विशेष काही प्राणी दिसले नाहीत त्यामुळे थोडा हिरमोड झाला पण हरकत नाही , जंगलात नुसते फिरणे हा एक मस्त अनुभव तर घेतला. 

 
दुपारी जेवण करून आम्ही पुन्हा एकदा सफारीसाठी निघालो, ह्या खेपेस नागरहोले National Park मध्ये . तिकडे Forest च्या बंदिस्त van मधूनच फिरावे लागते .  नागरहोले जंगल हे Project Tiger चा भाग आहे. अतिशय घनदाट , मे महिन्यात सुद्धा हिरवेगार. पुन्हा एकदा वाघ दिसेल ह्या आशेवर आम्ही नव्या उमेदीने सफारी सुरु केली. Van हळूहळू आखून दिलेल्या मार्गावर चालू होती . अचानक Driver ने डावीकडे बघण्यास सांगितले आणि ……. बघतो तर .... श्वास रोखून आम्ही सगळे बघत होतो …मंडळी नाही …. वाघ नाही … सांबरांचा एक कळप चरत होता … अगदी anticlimax झाला . 
  सुमारे दोन तास जंगलाचा आस्वाद घेऊन आम्ही संध्याकाळी Resort वर परतलो. फारच मस्त आणि अवर्णनीय अनुभव .  प्रत्येकाने किमान २-३ वर्षातून एकदा तरी जंगलात जाऊन यायलाच हवं असच मला वाटते .

२५ मे 


थोडे आरामात उठलो , सकाळी watch tower वर जाऊन काही दिसतंय का ते बघून आलो . Watch Tower मधेच बसून सकाळचा वाफाळता चहा घेतला . वाह… मजा आला .


समोर ढगातून सूर्याचे कवडसे डोकावत होते , मस्त फ्रेश वातावरण … अजून एक कप चहा हवाच ..

 

 चला …आता सफर 'ठीरुनेल्ली ' (अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Thirunelli_Temple)  देवळाची . Resort पासून फार लांब नाही . सुमारे १५-२० मिनिटातच पोहोचलो .  हे देऊळ अतिशय पुरातन, भगवान विष्णूचे .
 
 
 
 
देवळात प्रवेश करताना पुरुषांना उघड्या अंगाने म्हणजे shirt काढून जावे लागते . 
 
देवळाच्या मागच्या बाजूस एक छोटासा trek आहे , आम्ही तिकडे गेलो. पुन्हा एकदा गर्द झाडी , ताजी स्वच्छ हवा.  
 संध्याकाळी लाकद्दी (Lakkidi ) ला गेलो . हे वायनाड जिल्ह्यातले मोठे ठिकाण . गावात फिरणे आणि थोडीफार खरेदी असा दुहेरी उद्देश. महिलावर्ग Shopping च्या नावाने अगदी खुश !!!! आम्ही पुरुष मंडळी पण बायको ची कटकट नाही म्हणून खुश ... असो … जाताना घाटातून हे असे दृष्य दिसते .... 
 
 आपल्या जुन्या खंडाळा घाताची आठवण झाली . परताना रात्री उशीर झाल्याने नागरहोले च्या जंगलातून येताना Driver सकट आम्ही सगळे रामरक्षा म्हणत आणि देवाचे नाव घेत घेत आलो . कारण हत्तींची भीती ....  हा प्रवास म्हणजे नको असलेला थरारक अनुभव होता . Driver तर रात्री यायला तयारच नव्हता, त्याला कसाबसा तयार केलं . शेवटी एकदाचे कोणताही कुप्रसंग न घडता रात्री resort पोहोचलो.  अजून एक मस्त दिवस संपला. आता उद्याचा शेवटचा दिवस , अजून २-३ दिवस रहावसे वाटत होते पण ते शक्य नव्हते 
 

२६ मे बघता बघता शेवटचा दिवस आला , आज resort च्या बाजूने जंगल trek . दिलीप नावाचा स्थानिक रहिवासी आमच्या बरोबर गाईड म्हणून होता . त्याने आम्हाला जंगलाविषयी अतिशय उत्तम माहिती सांगितली , अनेक झाडे , पक्षी दाखवले . हत्तींच्या कळप कसा राहतो , त्यांच्या काय सवयी असतात , निरनिराळ्या प्राण्यांचे पायाचे ठसे बघितले. 

 
 
 दोन तास कसे निघून गेले काही कळलेच नाही .चला आता निघायला हवे . बंगलोर हून विमान पकडून पुन्हा पुणे गाठायचं . पुन्हा एकदा माणसांच्या गर्दीत , concrete च्या जंगलात जायचय. प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरीत्या आपला सहभाग निसर्गाच्या ह्रासाला कारणीभूत ठरतोय हे लक्षात ठेवायचं आणि उर्वरित आयुष्यात तरी आपण जबाबदारीने वागयाचय.
 
 


  Yatra Yatra