नियतीशी करार
नियतीशी करार -- भाग १
कधी कधी काही गोष्टी का घडतात आणि त्या तश्याच का घडतात हे आपल्याला समजत नाही. आता हेच पहा ना आपण कारमधून चाललेलो असतो आणि टोल च्या रांगेत नेमकी आपल्या पुढची कार टोल द्यायला टाळाटाळ करते किंवा काही प्रॉब्लेममुळे तिचा टॅग चालत नाही आणि आपण काही कारण नसताना उगीचच ताटकळत बसतो. किंवा कधी कधी उलटही घडतं , आयुष्यातला सगळ्यात छोटा आणि सोपा interview देऊन तुम्ही परदेशात नोकरीनिमित्त जाता आणि अनेक वर्ष आरामात तिकडे घालवता . ह्याला एकच उत्तर नशीब ,नियती किंवा काहीही म्हणा. असो.
@Abhijit
भारतात महिलांच्या क्रिकेटचा एकदिवसीय वर्ल्ड कप सुरु झाला . सामने कुठे कुठे आहेत हे देखील बहुसंख्य लोकांना माहिती नव्हते. भारताने पहिले दोन सामने आरामात जिंकले आणि तिसरा सामना साऊथ आफ्रिके बरोबर हरला ,जवळ जवळ जिंकलेला. पुढचा ऑस्ट्रेलिया बरोबर हि हरला. सामना हरला तरी एक गोष्ट घडली , भारताने ३३० धावा केल्या त्यासुद्धा दिड ओव्हर बाकी ठेऊन कारण आपला संघ आधीच सर्व बाद झाला. ऑस्ट्रेलिया ने सामना तसा आरामात जिंकला , तरी ह्या सामन्याने माझी उत्सुकता चाळवली. भारताचे सामने कुठे कुठे आहेत ,कोणाशी ,कधी आहेत हे बघायला सुरुवात केली. सहज म्हणून BookMyShow वर बघितलं तर नवी मुंबईला एक सेमी फायनल आणि मग फायनल अश्या दिसल्या. फायनल २ नोव्हेंबर रविवारी , क्लिक करून बघितले तर तिकीट available होती. काय झालं ते माहित नाही पण मी पटकन २ तिकिटं बुक करून टाकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही सेकंदात बुकिंग झालं . मागच्या वर्ल्ड कप (२०२३ पुरुषांचा) च्या तिकीट बुकिंगचा अनुभव फारच वाईट होता , म्हणजे transaction पूर्ण व्ह्यायला it took ages आणि शेवटी fail झालं. त्यामुळे सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही कि आपल्याला तिकिटं मिळालीय , मी दोन , तीन वेळेस चेक केले. खरं सांगायचं तर तोपर्यंत कोणते संघ सेमी फायनल खेळणार हे पण माहित नव्हतं , फायनलची तर गोष्टच सोडा .
भारत आपला पुढचा सामना ही हरतो इंग्लंड विरुद्ध . हा सामना आपण अश्या रीतीने हारतो की जिंकत आलेला सामना कसा हरावा ह्याचे कोणाला प्रात्यक्षिक द्यायचे असेल तर हा सामना दाखवावा . अतिशय निराशजनक पराजय . म्हणजे एकीकडे माझ्याकडे फायनल चे तिकीट आणि दुसरीकडे भारत सेमीफायनलला तरी पोचतो की नाही अशी अनिश्चितीतता. कारण आपण लागोपाठ तीन सामने हरलेलो. पण त्याचवेळेस नियती का काय असते ते ती आपलं काम सुरु करते. New Zealand चे लागोपाठ दोन सामने पावसामुळे रद्द होतात आणि त्यांना दोन सामन्यात मिळून फक्त दोन गुणच मिळतात. त्यामुळे आपला ,भारताचा पुढचा सामना जो New Zealand बरोबर असतो तो म्हणजे अक्षरशः quarter Final बनतो , जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये. भारत हा सामना अर्थातच आरामात जिंकतो आणि एकदाचा सेमी फायनल मध्ये पोचतो , पण समोर उभा ठाकतो तो ऑस्ट्रेलिया. जो संघ गेले १५ सामने , world cup मधले , अजिंक्य राहिलेला आहे. इथून सुरु होतो तो नियतीचा दुसरा अध्याय .
@Abhijit
सेमी फायनल सामन्यापूर्वीच भारताला एक जोरदार झटका मिळतो. प्रतिका रावल , जी आधीच्या सगळ्या मॅचेसमध्ये उत्तम खेळत असते ती स्पर्धेबाहेर होते दुखापतीमुळे . भारत मग शेफाली वर्माला बोलावणे पाठवतो कि जी ओरिजिनल १५ मध्ये पण नसते. ती आपली दूर कुठेतरी साधा आपला T २० चा सामना खेळत असते. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करते आणि फक्त ३३८ धावा करते. मी फक्त ३३८ असे म्हणतोय कारण ज्याप्रकारे लिचफील्ड खेळत होती ते बघता त्यांचे कमीतकमी ४०० तरी होतील असेच वाटतं . पण कश्यातरी भारताला विकेट मिळतात आणि ऑस्ट्रेलिया सर्व बाद होतो . भारताची फलंदाजी सुरु होते , ज्याची भीती असते तेच घडते ,शेफाली आणि स्मृती अगदी लगेच बाद होतात. जेमिमा आणि कर्णधार हरमनप्रीत मैदानावर. जेमिमा , जी गेले वर्षभर आपल्या anxiety शी झगडतीये , online trolling सहन करतीये, स्पर्धेत जिला दोन सामन्यात संघाबाहेर बसावं लागलं ती , आणि दुसरीकडे कर्णधार हरमन , जी संपूर्ण स्पर्धेत चांगली खेळली नाहीये , तिने कर्णधार म्हणून घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे टीकेची धनी झालीये अशी हि जोडगोळी मैदानात जम बसवते . ह्यापुढे जे घडतं ते अद्भुत , अविश्वसनीय , कल्पनातीत असतं . ह्या दोघी कधी आक्रमक तर कधी सावध खेळत भारताला लक्ष्याच्या जवळ नेतात. जी ऑस्ट्रेलिया कायम जिंकण्यासाठीच खेळते , ती अचानक एका सामान्य संघासारखी सोपे झेल सोडते , सोपे रन out च्या संधी सोडते . जेमिमा तिच्या आयुष्यातली कदाचित सर्वोत्तम खेळी खेळून जाते , अगदी २००१ च्या व्ही व्ही एस लक्ष्मण ची आठवण यावी , अशी. जरी हरमन बाद होते तरी बाकीचे उरलेले खेळाडू आपापली भूमिका चोख बजावतात आणि जेमिमाला साथ देऊन भारताला अंतिम फेरीत पोहोचवतात. हा दिवस जेमिमाचाच असतो. आज कोणीच तिला बाद करू शकणार नसतं , ना ऑस्ट्रेलिया , ना तिची शारीरिक आणि मानसिक दमणूक. विजय मिळाल्यानंतर वाहिलेल्या अश्रूंच्या धारा ह्या तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करतात. नियतीने तिच्या आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण केलेलं असतं .
@abhijit
एक गोष्ट नक्की होतं कि ह्यावर्षी नवीन संघ विश्वविजेता ठरणार कारण भारत आणि साऊथ आफ्रिका हे कधीच वर्ल्ड कप न जिंकलेले संघ समोरासमोर.
अहो आश्चर्यम ... माझ्याकडे एक नाही तर दोन तिकिटं आणि भारत फायनलला. आता आपल्यासमोर प्रश्न , आपण आपली घरातली लकी जागा , एक विशिष्ट सोफा खुर्ची , सोडून स्टेडियम मध्ये जायचं का ? काही झालं तरी ह्या खुर्चीत एका विशिष्ट कोनात बसून आपण भारतातला अनेक सामने जिंकून दिलेले असतात , T २० वर्ल्ड कप , आशिया कप सुद्धा आणि गेलो तर कोणाला बरोबर न्यायचं . फर्स्ट चॉईस माझा मुलगा , पण तो नाही म्हणतो , त्याची दुसऱ्या दिवशी परीक्षा असते. मुलीला विचारण्याचा प्रश्नच नसतो . मग मित्राला फोन. त्याला आधी खरं वाटतच नाही कि माझ्याकडे तिकिटं आहेत ,नंतर पटल्यावर तयार होतो लगेच, पण लगेच third umpire , सॉरी त्याच्या बायको , करवी बाद होतो . त्याचे सासू सासरे येणार असतात . आता ह्यावर तो काय अपील करणार. अचानक माझ्या मनात विचार येतो अरे , जी व्यक्ती आपल्याबरोबर गेली २५ वर्षे आहे आणि माझ्यासाठी लकी ठरली आहे अश्या व्यक्तीला , आपल्या अर्धांगिनीला , आपण विचारलेच नाही . जर तिची साथ मला माझ्या आयुष्यात लकी ठरत असेल तर ह्या सामन्यासाठी सुद्धा लकीच असेल. विश्वास ठेवा, खरं सांगतोय , एवढ्या सगळ्या लोकांना विचारल्या नंतर शेवटचा पर्याय म्हणून तिला विचारणे आणि तिला सोबतीसाठी तयार करणे हे , भारताला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जेव्हढे कष्टप्रद असेल , तेव्हढेच अवघड होते. पण सगळे व्यवस्थित घडून आपण आता सगळ्यांना सांगायला तयार असतो "येस .... आम्ही फायनल स्टेडिअममध्ये प्रत्यक्ष बघणार आहोत , ०२-नोव्हेंबर-२०२५ ला. "
नियतीशी करार -- भाग २
०२-नोव्हेंबर-२०२५ .सकाळपासूनच एक वेगळा उत्साह आणि हुरहूर मनात दाटलेली. कपडे कोणते घालायचे बरं ? माझ्या मनात प्रश्न . माझ्याकडे टीम इंडिया ची जर्सी , अर्थातच ४५ नं रोहित , असल्याने शर्ट आणि निळी जीन्स. प्रश्न आहे , कोणती inner wear pant घालायची ? ऑस्ट्रेलियाला हरवले त्यादिवशी कोणती घातली होती बरं ? ऑफ कोर्स Blue कलरची . Today is not a day to take any chance. तीच घातली. पुण्याहून निघणार असल्यामुळे लवकर , सकाळी १० लाच निघालो. गणपती बाप्पा मोरया .
रविवार आणि स्टेडियम highway वरच असल्यामुळे वेळेत म्हणजे १२.३० पर्यंत पोहोचलो. गाडी पार्क करून स्टेडियम कडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत असताना जाणवलं आज वेगळेच वातावरण आहे. बघावे तिकडे तिरंगा घेतलेले ,भारताची जर्सी घातलेले लोकं , त्यातही तरुणी आणि लहान मुलं , मुली. पण आकाशात मेघ दाटून आलेले , पाऊस पडत नव्हता पण कधीही पडेल अशी परिस्थिती. तिकीट चेक , सुरक्षा चेक करत करत आम्ही आत स्टेडियम मध्ये आमच्या स्टॅन्ड मध्ये पोचलो आणि पाऊस सुरु झाला. मैदान आणि पीच आधीपासूनच कव्हर केलेले होते. त्यामुळे आता प्रतीक्षा पाऊस कधी थांबतो ह्याची. स्टेडियम ही हळूहळू भरतय . मध्येच थोडा वेळ पाऊस थांबून उन्हाची तिरीप येते , ग्राऊंड स्टाफ सगळी कव्हर्स हटवतो आणि प्रेक्षकांचा एकच जल्लोष. लाऊड स्पिकर्स वर गाण्यांचा दणदणाट आणि स्टेडीयम मध्ये प्रेक्षकांचा. स्कोरबोर्ड स्क्रीन वर येते , टॉस ३ वाजता आणि सामना ३.३० ला सुरु होणार. पण अचानक पावसाची रीप रीप सुरु होते आणि मग खूपच मोठी सर येते. फोनवर मित्रांचे , नातेवाइकांचे मेसेजेस , आज मॅच होणार नाही का , किती वेळ बसणार आहात ? कधी परत येताय ? आपल्या मनात येते , आपल्याला स्टेडिअममध्ये सामना बघायला मिळणार ह्या असूयेतून तर हे असे प्रश्न विचारत नाहीत ? आपण मात्र शांत , कोणालाच उत्तर देत नाही. मनात आपण म्हणत असतो कि सामना आजच होणार , भले कितीही उशीर होऊ दे. तासभर तरी पाऊस थांबत नाही . लाऊड स्पिकर आणि प्रेक्षकांतून वर मग "रेन रेन गो अवे ..."अश्या आरोळ्या उठतात . आणि काय आश्चर्य ... पाऊस खरंच थांबतो आणि हळूहळू सूर्यदेव तळपू लागतात . आणि मग डिस्प्ले वर उमटते टॉस ४. ३० आणि सामना ५ वाजता सुरु. तोही पूर्ण षटकांचा. हळूहळू सगळी कव्हर्स हटतात , पीच दिसते . दोन्ही संघ वॉर्म उप करू लागतात.
@abhijit
Finally ... इट्स टॉस टाईम . दोन्ही कर्णधार मैदानात. स्टेडिअममध्ये पुन्हा एकदा जल्लोष . हरमन नाणं उंचावते आणि भारत नेहेमीप्रमाणे टॉस हरतो. साऊथ आफ्रिका पहिल्यांदा फिल्डिंग घेते. "इंटरेस्टिंग " , आपण मनात म्हणतो आणि थोडेसे सुखावतो. कारण नाही म्हटले तरी फायनल खेळताना धावांचा पाठलाग सोपा नाही आणि प्रेशर खूप जास्त. आता दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे आणि मग तो अवतरतो , क्रिकेटचा देव ,सचिन रमेश तेंडुलकर, हातात वर्ल्ड कप घेऊन ... स्टेडियम मध्ये आवाज टिपेला . स..चिन स... चिन .... कप पोडियमवर ठेवतो आणि दोन्ही संघांशी हस्तान्दोलन सुरु करतो आणि मग भारताचा प्रशिक्षक अमोलपाशी येऊन थांबतो , त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. काय बरं म्हटलं असेल त्याने ? त्याने ह्या कृतीतून आपल्या ह्या मित्राला , शाळेपासून बरोबर खेळलेल्या पण भारतासाठी कधीच न खेळायला मिळालेल्या ह्या आपल्या सवंगड्याला ? म्हणाला असेल "मित्रा , काळजी करु नकोस ... आजचा दिवस तुझा ". राष्ट्रगीतं सुरु . पहील्यांदा साऊथ आफ्रिका आणि मग भारत . "जय हे ... जय हे .... जय जय जय हे " .... स्टेडिअममध्ये छप्परफाड आवाज आणि मग "भारतमाता कि जय " , "वंदे मातरम " च्या दणदणीत आरोळ्या .
शेफाली आणि स्मृती मैदानात ....काउन्ट डाउन सुरु . ५ , ४ , ३ ,२ ,१ ....... फायनल ला सुरुवात आणि तुम्ही हा सामना प्रत्यक्ष स्टेडिअममध्ये बसून ह्याची देही याची डोळा पाहताय. सगळंच स्वप्नवत . भारताची आश्वासक सुरुवात ,कुठेही गडबड नाही . शेफाली तिच्या नेहेमीच्या अंदाजात चौकार मारून सुरुवात करते आणि स्मृती सुद्धा हळू हळू सेटल होते. बघता बघता ५० आणि १०० धावांचीओपनिंग पार्टनरशिप ती सुद्धा जवळ जवळ ६ च्या रन रेट ने . मस्त सुरुवात. आणि स्मृती बाद ... "हरकत नाही वेल प्लेड." आपण पुटपुटतो. जेमिमा अवतरते तीच मुळी टाळ्यांच्या गजरात. . दुसर्या बाजूला शेफाली मात्र मस्त खेळतीये आणि भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तिची खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे. शेफालीला सूर सापडलाय . आपण आता मनातल्या मनात ३२०, ३३० धावांची स्वप्न पाहायला लागतो आणि नेमकी शेफाली ८७ वर बाद . आदल्याच चेंडूवर अश्याच प्रकारचा शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला , पण अयशस्वी. ह्यावेळेस पुन्हा सेम शॉट आणि बाद. "अरे काय ...येडी आहे का ही ... सेंचुरी होती .... " आपण पुटपुटतो. दुसरीकडे जेमिमा चाचपडतीये .सगळ्यांना मागच्या ईनिंन्ग ची आठवण आणि तशीच पुन्हा खेळीची अपेक्षा . आपल्या मनात मात्र कुठेतरी शंका असते , एवढ्या मोठ्या खेळीनंतर मानसिकरीत्या पुन्हा उभे राहणे सोपे नाही, कारण जवळ जवळ सर्वस्व अर्पून केलेली खेळी पुन्हा २ दिवसात त्याच इंटेन्सिटी ने खेळणे सोपे नाही. अपवाद सचिन .. बॅक टू बॅक मोठ्या सेंचुरी शारजाला . हाच विचार मनात चालू असतानाच जेमिमा बाद . . हरमन आली आणि गेली , तिच्या नेहेमीच्या फ्लो मध्ये नाही वाटली . पण त्यामुळे आपली धावगती खाली आलीये आणि आता पुढच्या दीप्ती शर्मा आणि रिचा वरच भिस्त. आल्या आल्या षटकार मारून दिप्तीने जोरदार सुरुवात केली . पण दुसर्या बाजूने अमनजोत आधी आली. "रिचाला पाठवायला पाहिजे होते यार ... " आपण पुटपुटतो . दोघी एक , एक धावाच काढतायत , मोठे फटके नाही मारत ... आपण चरफडतो ... ४३ ओव्हर्स झाल्या सुद्धा, आपण अजून २५० चा टप्पा सुद्धा नाही गाठला. "आपलं रनिंग बिटवीन द विकेट खूपच बेकार आहे. फिल्डर वर प्रेशरच टाकत नाहीयेत " आपण कुरकुरतो . आपल्या एवढ्या सगळ्या अभ्यासपूर्ण टिप्पण्यांवर शेजारी बसलेल्या बायकोची प्रतिक्रिया फक्त एक जळजळीत कटाक्ष एवढीच असते. त्यात अमनजोत आऊट होते , "गुड" आपण पुटपुटतो . पुन्हा एकदा जळजळीत कटाक्ष येतो शेजारुन. "आता रिचा येईल , गुड फॉर अस " , मी म्हणतो. रिचा आल्या आल्या सिक्स , फोर मारते. आता शेजारी कटाक्ष टाकायची वेळ माझी. पण तरी आपण २९८ पर्यंतच मजल मारतो. "अजून २०-२५ रन्स तरी व्ह्यायला पाहिजे होते." मी फारसा खुश नाही . इंनिंग्स ब्रेकमध्ये डोक्यात तोच विचार , "खूप मस्त चान्स घालवला आपण , we should have batted them out. " तेवढ्यात पलिकडून विचारणा होते "निघायचं का ?पुण्याला घरी जाईपर्यंत खूप उशीर होईल पूर्ण मॅच बघितली तर.. कारण उशिरा सुरु झालीये , आताच ८. ३० झालेत , संपेपर्यंत रात्रीच १ वाजेल. मग रात्री ड्राईव्ह करुन जाणार का आपण ?" मी फक्त डॉन चित्रपटातल्या प्राण स्टाईल ने डायलॉग मारतो " कोई चान्स नही " आणि ठेवणीतला कटाक्ष मारतो .स्टेडियम मधल्या एवढ्या गोंगाटातसुद्धा तिचा सन्नाटा मला ऐकू येतो .
@abhijit
नियतीशी करार -- भाग ३
समोरच्या टीमची बॅटिंग बघणे हे खरं सांगायचं तर खूप जास्त अवघड असतं , कारण आपण त्यांच्या चांगल्या बॅटिंगचे मनापासून कौतुक नाही करु शकत , आपल्या फिल्डिंगच्या चुका , बॉलिंगच्या चुका आपले ब्लड प्रेशर वाढवतात. कसं असतं की जेव्हा समोरच्या संघाच्या विकेट्स काढायच्या असतात ,तेव्हा फिल्डिंग टीम बरोबर आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात . त्यातून आज आपण आपल्या लकी खुर्चीत नसतो. आता मी हळूहळू माझ्या झोनमध्ये जायला लागलो. मनातल्या मनात स्ट्रॅटेजिस आखायला लागलो विकेट काढण्यासाठी . म्हणजे आपल्या सीटवर बसायचा अँगल कसा हवा ह्याचा विचार करू लागलो. किती सरळ बसायचं , हात सरळ समोर ठेवायचा कि बाजूच्या सीटवर टाकायचा. हातात घेतलेला तिरंगा कसा ठेवायचा ? अगदी बारीक सारीक गोष्टी पण कधी कधी खूप महत्वाच्या ठरतात. काही काही बदल हे captain's instinct सारखे करायचे असतात. म्हणजे पाय तिरका करणे , हात गालाला लाऊन बसणे . You never know , what clicks. मनात एकच विचार "आज कोणतीही चुक नाही" . आता खरी मॅच सुरु , भारतीय संघाची आणि आपली सुद्धा.
भारतीय संघ huddle करुन , प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात मैदानात . साऊथ आफ्रिकेची सलामीची जोडी मैदानात. ब्रिट्स आणि लॉरा वोल्वर्डट . लॉरा कप्तान आहेच शिवाय सध्याची जगातली सर्वोत्तम फलंदाज , सेमी फायनल मध्ये इंग्लंड विरुद्ध अविश्वसनीय अशी १६९ धावांची खेळी. जबरदस्त फॉर्म मध्ये . आपल्यासाठी हिची विकेट लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक नाहीतर ही एकहाती साऊथ आफ्रिकेला कप मिळवू देऊ शकते. आपल्या प्रमाणेच साऊथ आफ्रिकेची सुद्धा चांगली पण जरा जास्त सावध सुरुवात. पण लॉरा जबरदस्त फॉर्ममध्ये, रन अ बॉल पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ने बॅटिंग करतीये. अगदी आरामात , पण ब्रिट्स मात्र हळूहळू खेळतीये. आपली गोलंदाजी अगदीच निष्रभ वाटतीये. होता होता साऊथ आफ्रिकेचे ५० झाले सुद्धा आणि एकही विकेट नाही. काहीतरी करायला हवे , आपण आपली स्ट्रॅटेजि बदलतो. आपण सीट मध्ये बसल्याचा अँगल बदलतो , तिरंगा हातात घेतो जो एवढा वेळ खुर्चीवर ठेवलाय. रेणुका बॉलिंगला येते , समोर ब्रिट्स. ब्रिटस मिड ऑन च्या दिशेने हळुवार फटका मारते , आणि धावायला लागते. चेंडू थेट अमनजोत कडे , ती डायरेक्ट थ्रो करून स्टम्प उडवते. ब्रिट्स बाद. साऊथ आफ्रिका ५१/१. स्टेडिअममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष. पुढची खेळाडू बॉश मैदानात. भारताकडून सुद्धा आता गोलंदाजीत बदल आणि श्रीचरणी कडे आता जबाबदारी. माझ्यामते ही भारताची बॉलर ऑफ द टुर्नामेंट. "गुड चेंज" , आपण पुटपुटतो . बॉश आल्यापासूनच अडखळत खेळतीये . श्रीचरणीचा चौथा चेंडू बॅकफूट वर खेळताना LBW आऊट. अचानक साऊथ आफ्रिकेच्या २ ओव्हर्स मध्ये दोन विकेट्स. साऊथ आफ्रिका ६१/२. भारतीय संघात आता जोश भरतो . आपण सुद्धा सुखावतो , आपली बसण्याची नवीन पोझिशन काम करते.
आता सुने लूस मैदानात लॉराची साथ द्यायला. साऊथ आफ्रिकेच्या दृष्टीने ही जोडी खूपच महत्वाची. लूस ची आश्वासक सुरुवात आणि दुसरीकडे लॉरा , फुल फ्लो मध्ये . अजिबात दडपण न घेता खेळतीये. बघता बघता तिच्या ५० धावा झाल्यासुद्धा , फक्त ४० चेंडूत आणि संघाच्या १००, ते देखील जळपास ६ च्या रन रेट ने . ही जोडी आता चांगलीच स्थिरावलीये . हरमनने बॉलिंग चेंजेस करुन बघितले , दीप्तीला पण आणले . पण ह्या दोघी आरामात खेळतायत. आपली चलबिचल सुरु होते. काहीतरी करायला हवे. चेंज ऑफ स्ट्रॅटेजि. तिरंग्याचे एक टोक बायकोकडे आणि दुसरे टोक माझ्याकडे, तिकडे हरमन सुद्धा नेहेमीच्या बॉलर कडून काहीच होत नाहीये म्हणून शेफालीकडे चेंडू सोपवते आणि तिच्या दुसर्याच चेंडूवर लूस शेफालीकडेच झेल देऊन बाद होते. हरमन थेट शेफालीकडे धाव घेते आणि शेफाली तिला उचलून कवेत घेते. साऊथ आफ्रिका ११४/३. आता मारिझने काप मैदानात , साऊथ आफ्रिकेची जुनी जाणती खूप अनुभवी खेळाडू. शेफाली तिच्या पुढच्या ओव्हरसाठी येते . एका अतिशय वाईट , बाहेर जाणाऱ्या चेंडूवर काप विकेटकिपर रिचाकडे झेल देऊन बाद होते. साऊथ आफ्रिका १२३/४ आणि शेफालीच्या दोन ओव्हर्स मध्ये २ विकेट्स. स्टेडियममध्ये शेफालीच्या नावाचा जयघोष ... शे... फाली , शे... फाली ... हीच शेफाली जी वयाच्या १६व्या वर्षीच भारताकडून खेळायला सुरुवात करते , लेडी सेहवाग म्हणून सगळे तिला डोक्यावर घेतात , पण गेल्या एका , दीड वर्षांत भारतीय संघातले स्थान गमावते , ह्या वर्ल्ड कप संघात १५ खेळाडूंच्या यादीत सुद्धा तिचे नाव नसते , केवळ प्रतिका रावल दुखापतग्रस्त होते म्हणून हिला SOS पाठवून संघात घेतले जाते. आज आत्ता तीच शेफाली तिच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे क्षण जगत असते . नियतीने तिच्याही आयुष्यातले एक वर्तुळ पूर्ण केलेलं असतं.
आता सीनलो जाफ्ता मैदानात , माझ्यामते साऊथ आफ्रिकेची घोडचूक. कारण संपूर्ण स्पर्धेत हिला अजिबात सूर सापडलेला नाहीये आणि अतिशय संथ बॅटिंग केलेली. हिच्याऐवजी डर्कसन आली पाहिजे होती. पण साऊथ आफ्रिका ही नेहेमीच सेफ खेळायला जाते ,always as per the plan. Never try to surprise the opposition. असो. त्यांची ही चूक आपल्या पथ्यावर पडतीये. जाफ्ता अतिशय संथ खेळतीये , लॉरा ला हवी तशी स्ट्राईक न मिळाल्याने आफ्रिकेचा रन रेट हळूहळू खाली जायला लागतो. अखेर जाफ्ता बाद होते पण भरपूर निर्धाव चेंडू खेळून . साऊथ आफ्रिका १४८/५ , ३० ओव्हर्स मध्ये . आता फक्त ५ खेळाडू बाकी . पण लॉरा अजूनही खेळतीये आणि मिळेल तेव्हा चौकार मारतीये. लॉराच्या साथीला आता डर्कसन मैदानात. आल्या आल्या हिने आक्रमक पवित्रा घेत चौकार मारत , लॉराला मस्त साथ द्यायला सुरुवात केली. दोघांचं रनिंग बिटवीन द विकेट मस्त , फिल्डर वर प्रेशर टाकत एका च्या ऐवजी २ धावा घेतायत . पहिल्यांदाच भारतीय संघ दबावात आल्यासारखा वाटतोय. राधा यादवने टाकलेला नो बॉल , ज्यावर सिक्स बसली आणि पुढच्या फ्री हिट वर अजून एक सिक्स ,म्हणजे १ चेंडूत १३ धावा . स्टेडिअममध्ये अगदी सन्नाटा , भारतीय टीम गोंधळल्या सारखी वाटतीये. मला सुद्धा स्ट्रॅटेजि बदलली पाहिजे. आता तिरंग्याची दोन्ही टोकं माझ्या हातात , बसण्याचा अँगल परत बदलला. तिकडे हरमन ने सुद्धा दिप्तीला आणलं. अँड शी डिड इट . डर्कसन क्लीन बोल्ड बाय दीप्ती. अतिशय धोकादायक भागीदारी संपुष्टात. भारत पुन्हा एकदा मॅचमध्ये वरचढ. आता अडसर केवळ लॉराचा. पण ती उभी आहे , कोणतीजी गडबड न करता ९९ वर. साथीला आलीये आता ट्राऑन. लॉराने एक सिंगल घेत आपली सेंचुरी पूर्ण केली. पूर्ण स्टेडियम उभं , टाळ्यांच्या कडकडाट तिच्या खेळीला मानवंदना देतंय . जबरदस्त इनिंग. सेमी फायनल आणि फायनल अश्या लागोपाठ दोन सेंचुरी. What a player !!!
एवढं खेळून सुद्धा ती अजिबात दमल्यासारखी वाटत नाहीये. लॉरा ला आता बाद नाही केलं तर वर्ल्ड कप विसरावा लागेल . आपण सुद्धा अस्वस्थ होतो , लॉराला बाद करायलाच पाहिजे. पुन्हा एकदा स्ट्रॅटेजि चेंज , आता तिरंगा हातात घेऊन दोन्ही हात मांडीवर आणि अगदी निर्वाणीचा उपाय अंमलात , मनाततल्या मनात एक मंत्र पुटपुटणे सुरु . हा उपाय कामी नाही आला तर संपलं सारं. ४२ वी ओव्हर टाकायला दीप्ती सज्ज , समोर लॉरा . आता तिला मोठे फटाके मारण्याशिवाय गत्यंतर नाही कारण required run rate ८ च्या पुढे. दीप्तीच्या चेंडूवर लॉरा ने पुढे सरसावत फटका मारायचा प्रयत्न केलाय , पण नाही बसला बॅटवर. चेंडू वर उडालाय , अमनजोत झेल घेण्यासाठी सरसावलीये , तिने झेल घेतला पण चेंडू हातातून उडाला. "अमनजोत ने झेलच नाही तर वर्ल्ड कप टाकलाय..... " आपल्या मनात येतं . पण तिने तो परत झेलला आणि पुन्हा एकदा तिच्या हातातून उडाला आणि तिसऱ्यांदा मात्र तिच्या तिच्या हातात विसावला. ती आणि पूर्ण टीम आनंदाने बेभान. आपण आपल्या बायकोला अत्यानंदाने मिठी मारतो . हा झेल नुसता झेल नसून वर्ल्ड कप अमनजोतने हातात घेतलाय. साऊथ आफ्रिका २२०/७. ह्याच ओव्हर मध्ये ट्राऑन सुद्धा बाद , साऊथ आफ्रिका २२१/८. अचानक भारत वर्ल्ड कप विजयाच्या उंबरठ्यावर. केवळ २ विकेट्स , म्हणजे २ चेंडू .
स्टेडिअममध्ये आता नुसता दणदणाट , आरोळ्या आणि घोषणा. बघता बघता ९वी विकेट सुद्धा गेली. खाका रन आऊट . आता मात्र हातात मोबाईल , विजयी क्षण कधीही येईल , तो टिपण्याची धडपड. ०२-नोव्हेंबर संपून आता ०३-नोव्हेंबर सुरु झालाय , घड्याळात १२ वाजून ०२ मिनिटं झालीयेत , दीप्ती ४६वी ओव्हर टाकायला सज्ज , तिसरा चेंडू ,फुलटॉस , क्लार्क कव्हर च्या डोक्यावरुन मारण्याच्या प्रयत्नात , चेंडू हरमन पासून थोडाच दूर , ती झेपावलीये आणि तो क्षण आला. क्षणभर आपण हे दृश्य प्रत्यक्ष बघतोय ह्यावर विश्वासच बसत नाही. अख्खा संघ हरमनच्या दिशेने बेभान होऊन धावतोय , कोचिंग स्टाफ , राखीव खेळाडू सगळे च्या सगळे मैदानावर धाव घेतायत. त्याचवेळी आपल्या डोळ्यांपुढची दृष्य थोडी धुसर होतायत , नाही हे मैदानात चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीच्या धुरामुळे नाही. आपले डोळे आनंदाश्रुनी डबडलेत . पुन्हा एकदा भारताने वर्ल्ड कप जिंकलाय आणि मी तो जिंकताना प्रत्यक्ष बघितलाय. सगळेच एकमेकांना मिठ्या मारतायत , भारतमाता की जय चा जयघोष चालु झालाय , खेळाडू रडतायत , कोचिंग स्टाफ रडतोय , स्क्रिनवर रोहित शर्माला दाखवतायत. तो फक्त एकदा वर आकाशात बघतो , काय म्हणत असेल मनात "नियतीने त्या दिवशी (ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल) मला अशीच साथ द्यायला पाहिजे होती" असे म्हणाला असेल कि दुसरं काही ? आपल्याला कधीच नाही कळणार .
स्टेडियमवरचं आकाश फटाक्यांच्या आतषबाजीने फुलून गेलंय. हरमन आता भारताचा कोच अमोल मुझुमदार कडे वळतीये आणि त्याच्या मिठीत विसावलीये . दोंघांच्या डोळ्यांत अश्रू . समाधानाचे , कर्तव्यपूर्तीचे , गेले २ वर्षे घेतलेल्या मेहेनतीचे , आखलेल्या डावपेचांच्या पूर्ततेचे , आलेल्या प्रत्येक निराशेच्या क्षणांवर मात करुन पुढे जाण्याचे , झालेल्या चुकांतून शिकून पुढे जाण्याचे आणि अंतिम लक्ष्यपूर्तीचे .
अमोल , केवळ नियतीने साथ न दिल्याने भारताकडून न खेळलेला सर्वोत्तम फलंदाज. चुकीच्या काळात जन्माला आला, थोडं पुढे मागे जन्मला असता तर नक्कीच खेळला असता . पण जेव्हा नियती तुमच्या हातातून एक संधी नेते तेव्हाच ती दुसरी संधी पुढे करते. नियतीचा हाच न्याय पहा ,ज्या राहुल द्रविड बरोबर अमोल ची भारतासाठी खेळण्याची स्पर्धा होती , त्याच राहुल द्रविडला भारताला वर्ल्ड कप (One Day ) नाही जिंकता आला पण अमोल आज वर्ल्ड कप विनिंग कोच बनलाय .
इयान बिशप ने commentry मध्ये म्हटल्याप्रमाणे " After losing 3 matches some might have thought , this Indian team is a history , but tonight this team is creating their own history. " मी हे खात्रीपूर्वक म्हणू शकतो की नियतीने माझ्या बरोबर काहीतरी करार केला म्हणूनच आज मी इथे आहे , क्रिकेट बघणाऱ्या जवळपास १५० कोटी लोंकांपैकी फक्त ४० हजार लोकंच आज इथे आहेत आणि मी त्यापैकी एक आहे. आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर इतिहास घडताना मी पाहिलाय !!!
Comments
Post a Comment