श्री सो.डी.माहात्म्य

श्री सो.डी.माहात्म्य 
अध्याय पहिला 

कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय,  म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? "
शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं. म्हणाले " उमा, मी बघतोय , गेले काही दिवस तुझं तुझ्या लाडक्या पृथ्वीकडे फारसं लक्ष नाहीये . फेसबुक वापरणं सोडून नाही ना दिलंस."
"नाही हो स्वामी . आत्ताच नवीन पोस्टला लाईक करून आले. पण खरं आहे तुमचं. " पार्वती म्हणाली. " गेले ४०-४५ दिवस  देवळातली गर्दी कमी झाल्याने , मानवाकडे आणि पर्यायाने पृथ्वी कडे थोडं दुर्लक्षच झालं माझं. गजानन आणि कार्तिक देखील मला म्हणाले.  सध्या त्यांचं देखील काम बरंच कमी झालंय . म्हणूनच विचारतीये नाथ , हे असं कसं काय घडलं ? मानवापुढील सर्व समस्या सुटल्या काय ? की तो खरंच शहाणा झाला? सांगा..  स्वामी मला लवकर सांगा. नाहीतर मी गुगलवर शोधेन हं "

सस्मित चेहऱ्याने भगवान म्हणाले "देवी तुला खरंच काही माहिती नाही ? वंडरफूल ".
"नाही महाराज खरंच नाही माहिती. "
भगवानांनी एक सुस्कारा टाकला, "अग हो हो...जरा दमानं . कुठं सोडली ही तुझी चेन्नई एक्सप्रेस. ठीक आहे तर ऐक तर . हा सगळा सोशल डिस्टंसिंग उर्फ सो. डी. व्रताचा परिणाम आहे." पार्वती स्तिमित झाली . "सो. डि. व्रताचा ? हे कोणते व्रत नाथ ? हे एवढं शक्तिशाली व्रत कसं करावं ? हे व्रत प्रथम कोणी केलं ?मला पूर्ण माहिती द्या महाराज. "
त्यावर महादेव उच्चारले "ऐक तर मग. अगदी अलीकडे नारदमुनी पृथीवर वुहान प्रांती हिंडत असताना तेथे अनंत माणसे खूप दुःख भोगत आहेत , कोणत्या तरी असाध्य व्याधीने ग्रस्त आहेत असे त्यांना दिसले . तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले . तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर म्हणाले "नारायण ...  नारायण .. देवा , हे मी काय बघतोय , तिकडे वुहान प्रांती जनता एवढी त्रस्त असताना तुम्ही इकडे आराम करताय ? प्रभू काहीतरी उपाय करा."
श्रीविष्णू म्हणाले " नारदा , अरे मला कसं काय कळणार ? तिथे फेसबुक नाही , व्हाट्सऍप नाही. मला कशी काय खबर लागणार ? सांग बरं मला सविस्तर सगळं."
नारदाने त्याचा आयपॅड काढला आणि पूर्ण इतिवृत्तांत दाखवला .
"अस्स्स ... " नारायणांनी एक उसासा सोडला .   "नारदा, अरे  कधी ना कधी हे घडणारच होतं . मानवाची अमर्याद भूक त्याला शेवटी ह्या अवस्थेकडेच नेणार होती .  पण घाबरू नकोस , यदा  यदा ही धर्मस्य ...... "
"देवा , देवा अहो हे काय पाल्हाळ लावलय तुम्ही , तिकडे जनता भयभीत आहे आणि तुम्ही नवीन जन्म घेण्याचा  डायलॉग मारताय ? केवढा वेळ लागेल ह्या प्रोसेसला. अहो तिकडे पृथ्वीवर अजाईल इम्प्लिमेंटेशन सुरु झालाय आणि अजून तुम्ही तुमच्या जुन्या प्रोसेसमध्येच अडकलाय ?".
"ओके नारदा , ह्यावेळेस नवीन टेक्निक सांगतो . बघ बरं हे व्रत खूप कठीण आहे."
"हे प्रभो लवकर सांगा. उतणार नाही , मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. "
"ऐक तर मग . हे सो. डी. व्रत.... "
"काय म्हणालात प्रभू ? सो.डी. ? हे कोणतं व्रत ?"
"होय नारदा , सो.डी. म्हणजेच सोशल डिस्टंसिंग व्रत . नावाप्रमाणेच बरंच काही सोडून द्यायचं व्रत . ह्या व्रतात काय सोडावं .
परक्या व्यक्तींचा हातात हात घेणं सोडाव .
लोकांना मिठ्या मारणं सोडावं .
 नाक , कान , चेहरा खाजवणे सोडावं .
रुमालाशिवाय शिंकण सोडावं .
घराच्या बाहेर उगाच फिरणं सोडावं . बाहेरचं खाणं सोडावं"

"बास बास देवा ...केवढी मोठी ही लिस्ट ? हे सगळं सोडलं तर मानवाचं सगळं दुःख दूर होईल देवा ?"
नारायण सस्मित चेहेर्याने म्हणाले " मी तर वैश्विक सत्य आधीच सांगितलं आहे नारदा . कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥  मानवाने फक्त त्याचे कर्म करायचे आहे , फळाची , परिमाणाची चिंता कशाला. "

"नारायण ....नारायण " नारदमुनी हसत हसत म्हणाले.

एवढं बोलून महादेव थांबले. पार्वती स्मितीत झाली , म्हणाली "पुढे काय झाले स्वामी? मानवाने हे व्रत अंगिकारले का ? त्याचे दुःख दूर झाले का ? बोला नाथ बोला. "

"हो..  हो..  प्रिये , थोडा दम धर . ह्याच्या पुढची कहाणी ऐक आता पुढच्या अध्यायात "

श्री आंतरजाल पुराणातील  डिजिटल खंडातील श्रीसो.डी. कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला.

हरये नमः । हरये नमः ।

© अभिजित देशपांडे 







Comments

Popular posts from this blog

सफर जंगलाची !!!

श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय