श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय

श्री सो.डी.माहात्म्य  
द्वितीय  अध्याय 

आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते .  दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच. 

एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली. लोकं त्याच्या कारभारावर अगदी खुश होते . राजा आपल्या दरबारात बसला होता , तेव्हा सेनापती त्याला म्हणाला "महाराज आत्ताच  गुप्तचराने खबर आणली आहे , आपल्या शेजारील राज्यांत कोणत्या तरी गूढ रोगाने धुमाकूळ घातला आहे. आपण सुद्धा सतर्क राहायला हवं ." 

"ह्य ... सेनापती , तुमचं काय डोकं बीक फिरलंय काय ?" राजा एकदम चिडून म्हणाला "आपली एवढी शक्तिशाली सैन्य , आरोग्य यंत्रणा असताना कसली चिंता आणि  आपण चारी बाजूनं समुद्राने वेढलेले असताना , काय बिशाद आहे कोणताही रोग आपल्यावर हल्ला करण्याची ? " 

"नाही महाराज . हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय . खूप वेगाने  आणि अत्यंत छुप्या पद्धतीने हा हल्ला होतो. "

"हम्म . सेनापती सांगा पाहू अजून काही माहिती. कसं काय रोखायचं ह्याला. "

"ऐका महाराज. सध्या तरी ह्यावर कायमस्वरूपी इलाज नाहीये. पण एक व्रत आहे , ते केल्याने ह्याचा प्रतिकार करता येईल. श्री सो. डी. व्रत अंगीकारावी लागेल"

"काय? काय म्हणालात ? सो. डी. ? हे कोणते व्रत ?"

"होय महाराज . प्रत्यक्ष नारायणाने हे नारदाला मानवाच्या सुखासाठी हे व्रत सांगितले आहे. हे व्रत केले असता मनुष्यच्या सर्व दुःखांचा नाश होतो . व्रताच्या प्रभावाने तो पृथीवर परम सुख पावून शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो. "

"सेनापती , हे व्रत कसे करावे , मला सगळं नीट समजावून सांगा ." 

सेनापतीने राजाला सगळे व्रत साग्रसंगीत समजावले आणि तो राजाच्या निर्णयाची वाट बघत बसला . 

राजा हे सगळे ऐकून खो खो हसायला लागला. त्याने ह्या व्रताचा उपहास करायला सुरुवात केली आणि अद्वातद्वा बोलून त्याने सेनापतीला अपमानित केले.  

असेच काही दिवस गेले. राज्यात काहीतरी बिघडलंय , लोकं अस्वस्थ आहेत अशी राजाला जाणीव झाली. राजाने दरबारात कारण विचारले. "क्षमा असावी महाराज." सेनापती बोलला " मी पूर्वी दिलेल्या धोक्याकडे तुम्ही दुर्लक्ष केला महाराज . आपल्या राज्यावर त्या भयंकर रोगाने हल्ला केलाय आणि लोकं आजारी पडू लागलेत. अजूनही वेळ गेलेली नाही महाराज , लोकांना श्री सो. डी. व्रताचं पालन करायला सांगावं." एवढं बोलून सेनापती गप्प बसला. 

राजा विचारात पडला . "ठीक आहे . लोकांना हे व्रत समजावून सांगा आणि हे व्रत ऐच्छिक आहे , असंही सांगा. ज्यांना हे पाळायचं नाही त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. मी स्वतः देखील हे व्रत पाळणार नाहीये. माझा ह्या अश्या व्रतवैकल्यांवर विश्वास नाही. "

"पण महाराज अश्याने हा रोग अजून पसरेल. "

"हरकत नाही. काही म्हातारे लोकं मारतील. काही लवकर मरतील. शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे ." एवढं बोलून त्याने दरबार बरखास्त केला. 

इकडे राज्यात हाहाकार माजला . लोकं खूप मोठ्या संख्येने आजारी पडू लागले , मृत्युमुखी पडू लागले. तरीही बहुसंख्य लोकं व्रत पाळत नव्हते . राजाने तर ह्या व्रताचा अवमान करणे चालूच ठेवले. शेवटी ज्याची भीती होती तेच घडले. घाट झाला .  प्रत्यक्ष राजालाच रोगाने गाठले. राजा अत्यवस्थ झाला आणि त्याला राजवैद्यांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवावे लागले. राजवैद्याने अनुभवाची आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करून राजाचे प्राण वाचवले . 

हे सगळं अनुभऊन राजाचे डोळे उघडले. अश्या रीतीने राजाने श्रीसो. डी. व्रताचे महत्व जाणले. म्हणाला "उतणार नाही. मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही."

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचां उत्तरी सफळ संपूर्ण. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ही कहाणी ऐकवून महादेवाने पार्वतीकडे सहेतुक पाहिले. 

" स्वामी , खरंच हे व्रत ऐकून मी धन्य झाले." पण तरी पार्वतीचे समाधान काही झाले नाही. "पण स्वामी मला सांगा , हे असं किती दिवस चालणार ? मानवाला अशी बंधनात रहायची सवय नाहीये. तसंच हे असंच चालू राहिलं तर संपूर्ण अर्थचक्रच रुतून बसेल. बोला नाथ बोला. "

भगवान हसले. "प्रिये, अगदी अचूक बोललीस बघ. सर्वसामान्य मानव स्वभाव हा तात्कालिक संकटांचा विचार करतो , तो बर्याचदा  फार लांबचा विचार करत नाही. "

"पण हे भगवान आपण तर सगळं जाणताच , मग तुम्ही का नाही काही करत?"

भगवान शंकर फक्त हसले. 

श्री आंतरजाल पुराणातील  डिजिटल खंडातील श्रीसो.डी. कथेचा द्वितीय अध्याय येथे समाप्त झाला.

हरये नमः । हरये नमः ।

© अभिजित देशपांडे 
Comments

Popular posts from this blog

सफर जंगलाची !!!

श्री सो.डी.माहात्म्य