जीना यहाँ , मरना यहाँ ...

एक टिपिकल सकाळ . डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतय , आपल्याला उठवत नाहीये , पण नाईलाज आहे. कसबस उठुन अर्धवट झोपेत ब्रश सुरु झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भुले बिछडे  गीत' सुरु झालंय , लता गातीये कधी  ' राजा की आएगी बरात  ... '  तर कधी 'बरसात मे  हमसे मिले तुम ... ' . सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातल हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासुन सुरु झालेला रेडिओ हा रात्री छायागीत , बेला के फुल ऐकुनच बंद व्हायचा.  त्याकाळी रेडिओ हा मध्यम आणि निम्न मध्यमवर्गाच्या आयुष्याचा अगदी अविभाग्य घटक . नंतर साधारण ७८ ,७९ च्या  सुमारास घरात टेलिव्हिजनचे आगमन झाले . अचानक इतके दिवस नुसती ऐकलेली गाणी प्रत्यक्ष दिसायला लागली. रेडिओमुळे  गाण्यांचं संगीत , गायक आवडायचे  आणि आता प्रत्यक्ष चित्रीकरण बघुन पडद्यावरचे कलाकार आवडू लागले. हळूहळू रेडिओ मागे पडायला लागला. तरीही सकाळी रेडिओ हा हवाच , त्यामुळे 'भुले बिछडे  गीत' ऐकू येतंच होतं . नंतर पुढे  उच्च  शिक्षणासाठी घरापासून दूर गेल्यावर अचानक रेडिओ पुन्हा एकदा मेन स्ट्रीम मध्ये आला  , पण ह्यावेळेस नुसतं संगीत ,गायक नाहीत तर गीतकारालासुद्धा बरोबर  घेऊन. जसजशी गाणी अधिक बारकाईने ऐकायला लागलो ,तेव्हा नुसती चाल नाही तर गीतांचे शब्द देखील ऐकायला लागलो ,तसं लक्षात येऊ लागले की खूप साऱ्या गाण्यांमध्ये बराच अर्थ दडलाय . मग हे गाण्यांचे शब्द ऐकण्याचे वेड वाढतच गेलं . हळूहळू मग गीतकारांची माहिती होऊ लागली आणि मग लक्षात आलं की आपल्याला आवडणारी बरीचशी गाणी ही एकाच गीतकाराची आहेत आणि एवढच नाही तर त्याने आपला  प्रत्येक मूड पकडणारी गाणी लिहिलीयेत , तो गीतकार म्हणजे कवी शैलेंद्र.

शंकरदास केसरीलाल नावाने रावळपिंडीत जन्मलेला , अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वाढलेला , जातीयवादाचा शिकार झालेला , रेल्वे वर्कशॉप मध्ये नोकरी करणारा ,सिनेमा आणि सिनेसंगीताबद्दल तिटकारा असणारा पण शैलेंद्र ह्या टोपणनावाने कविता करणारा अपघाताने किंवा नाईलाजाने सिने गीतकार बनतो काय आणि अवघ्या १६-१७ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आख्ख्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवतो काय तेही साहिर , हसरत , मजरुह ,शकील ह्या दिग्गच्यांच्या स्पर्धेला तोंड देत. सगळंच विलक्षण .

हालाखीच्या परिस्थितीमुळे  शैलेंद्रच्या परिवाराने रावळपिंडीहून मथुरेला प्रस्थान केले, तिथे त्यांचे मोठे भाऊ रेल्वेत नोकरीत असल्यामुळे कुटुंबाला आधार होता. तिथेच सरकारी शाळेमधून ते इंटर पास झाले तेही राज्यात (उ.प्रदेश) तिसऱ्या क्रमांकाने . पुढे शिकायची खूप ईच्छा होती पण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि ते मुंबईला माटुंग्याला रेल्वे वर्कशॉप मध्ये ट्रेनी म्हणुन रुजू झाले . कसकाय ते कोणास ठाऊक पण त्यांना  लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा आणि डफ वाजवण्याचा छंद लागला होता . खूप  उदास वाटायला लागलं की दूर कुठेतरी यमुनेतीरी एकटंच बसुन कविता लिहायचे , नाहीतर डफ वाजवत बसायचे.( हे डफलीप्रेमच एक दिवस त्यांना राज कपूरचा अत्यंत जिवलग मित्र बनवणार होतं . इतकं की राज कापूरनी पडद्यावर  अनेक गाण्यांत डफली वाजवली श्री ४२० , हिस देश मी गंगा ... इत्यादी) . मथुरेत असतांनाच त्यांच्या कविता साधना , हंस, नया युग इत्यादी मासिकांत प्रकाशित व्हायला लागल्या होत्या आणि त्या लोकांना आवडतही होत्या. मुंबईत आल्यावर खाण्या-पिण्याचा प्रश्न  तर सुटला पण मशीनच्या कोलाहलात खूप घुसमट होत होती ,त्यांच्यातला कवी हा आतल्या आत कुढत होता . कवितेवरचं प्रेम काही कमी झालं नव्हतं , पण काय लिहायचं आणि कोणासाठी ? हा साधारण १९४२चा काळ , स्वातंत्र्य  चळवळ अगदी शिखरावर होती. सगळीकडे भारत छोडो आंदोलनं , करो या मारो चे नारे चालू होते . ह्या वातावरणाचा शैलेंद्रच्या मनावर परिणाम झाला नसता तरच  नवल . त्यांनीही आंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्याच वेळेस ठरवलं की आता लेखणीही ह्याच कामासाठी वापरायची. डफली घेऊन तेही इप्टा(इंडिअन नॅशनल थिएटर) च्या नाटकांमध्ये आपल्या स्वातंत्राविषयीच्या, क्रांतिकारी कविता लिहू लागले ,म्हणू लागलें . पुढे स्वातंत्र्य तर मिळाले , पण फाळणीची किंमत चुकऊन. उद्विग्नतेने आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी लिहिले

सुन भैया , सुन भैया
दोनो के आँगन एक थे भैया 
कजरा और सावन एक थे भैया 
ओढ़न पहरावन एक थे भैया 
जोधा हम दोनों एक ही मैदान के 
परदेसी कैसे चाल चल गया 
झूठे सपनों में हमको छल गया 
वो डर से घरसे निकल तो गया 
पर दो आँगन कर गया मकान के 

अनेक कवी संमेलने ,मुशायरे ह्यांमधून त्यांचे काव्य वाचन , गायन चालूच होते. अश्याच एका कवी संमेलनात ते त्यांची प्रसिद्ध 'जलता  है पंजाब हमारा ... ' ही कविता सादर करत असताना त्यांना पृथ्वीराज आणि राज कपूर ह्यांनी ऐकले. हाच तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण . काव्यवाचनानंतर राज लगेच शैलेन्द्रना भेटला , म्हणाला " मी आग नावाची फिल्म करतोय , माझ्या फिल्मसाठी गाणं लिहशील ? " ताडकन शैलेंद्र म्हणाले " नही. मै पैसों के लिए नहीं लिखता . अशी कोणतीच गोष्ट तुझ्याकडे नाहीये की ती मला तुझ्यासाठी गाणं लिहायला उद्वयुक्त  करेल , जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी लिहीन . " राज म्हणाला "हरकत नाही .काही मदत लागल्यास सांग. "

रेल्वेच्या नोकरीत तुटपुंज्या पगारात कसंबसं आयुष्य चालु होतं आणि त्यावेळेसच्या रिवाजानुसार घरुन लग्न करण्यासाठी सतत विचारणा होत होती. लांबच्या नातेवाईक असलेल्या शकुन्तलाबरोबर त्यांचं  मन जुळलं आणि दोघांचं लग्न झालं . लग्नातसुद्धा सगळ्यांनी बोल लावले कारण नवऱ्यामुलाकडे घालायला धड कपडे सुद्धा नव्हते. पण शकुंतला आणि तिच्या घरच्यांनी खूप साथ दिली. लग्न तर झाले , पण मुंबईमध्ये दोघं राहु शकतील अशी जागा आणि आर्थिक परिस्थिती नव्हती . चारच दिवसांत ते एकटे मुंबईला परतले आणि रोज पत्नीच्या आठवणीत व्याकुळ होत होते. शेवटी कशीबशी परळला रेल्वे कॉलोनीत  एक छोट्याशी  खोलीत्यांना मिळाली आणि  त्त्यांचा संसार सुरु झाला . वर्षभरातच नव्या पाहुण्याची चाहुल लागली. घरी आधीच चणचण , त्यात कोणाचा आधार नाही त्यामुळे बाळंतपण  शकुंतलेच्या माहेरी, झाँशीला ,करायचे ठरले. बायकोला माहेरी पाठवायला सुदधा पैसे नव्हते , अचानक त्यांना राजचे बोल आठवले आणि तडक ते त्याला भेटायला त्याच्या महालक्ष्मीच्या (तेव्हा आर  के स्टुडिओ नव्हता ) ऑफिसात गेले . दारवानाला सांगितले "जा जाऊन सांग , कवी शैलेंद्र भेटायला आलेत " राज जेव्हा भेटायला आला तेव्हा त्याला शैलेंद्र खूप दुखी , तणावात , चिडलेले वाटले . ताडकन शैलेंद्र म्हणाले " तू मला त्या दिवशी भेटायला आला होतास. आठवतंय ?" राजने हो म्हणताच म्हणाले "मला आत्ता ५०० रुपयांची गरज आहे , तुला जे काम करून घ्यायचं असेल ते करुन घे . " राजने तात्काळ पैसे दिले आणि इथूनच एका महान पर्वाला आणि दोस्तीला सुरुवात झाली . जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ही दोस्ती टिकली.

काही दिवसांनी शेलेंद्र राजकडे पुन्हा गेले , खिशात हात घातला आणि ५०० रुपये काढले , राजने ते पाहिलं , पैसे परत केले ,चेहेर्यावर मिश्किल हास्य आणुन म्हटलं " अरे बाबा , बरसात बनवतोय , दोन गाणी लिहुन दे. " शैलेंद्रनी जी २ गीते लिहिले , त्यापैकी एक बारसातचे टायटल सॉंग बनले , जे भारतीय सिनेमाच्या इतिहासातले पहिले शीर्षक गीत (टायटल सॉंग) मानलं जातं ,  "बरसात में हमसे मिले तुम सजन  , बरसात में ... " इथून पुढें मग शैलेंद्र ने कधी मागे वळून पाहिलंच नाही. घरात देखील पैश्यांची कमी पडली नाही  , जणू काही घरी सुद्धा पैंसों की बरसात सुरु झाली .  अगदी नवीन बान्धलेल्या  बंगल्याचं देखील नाव ठेवला गेलं 'रिमझिम' . इथूनच मग पुढे राज कपूर , शैलेन्द्र , शंकर- जयकिशन असं त्रिकुट जमलं ते अगदी शेवटपर्यंत .आवारा , आह , चोरी चोरी , श्री ४२० , अनाडी ते मेरा नाम जोकर पर्यंत . एक दिवस राज बळेच शैलेन्द्रना घेऊन गेले, के. अब्बासांकडे ,चित्रपटाची कथा ऐकायला . अब्बासनी ह्या साधारण दिसणाऱ्या आणि अतिसामान्य कपडे घातलेल्या शैलेंद्रकडे अजिबात लक्ष दिल नाही , हा कोण , काय करतो हे देखील विचारल नाही. अब्बासनी २-२.५ तास कथा वाचन केलं आणि मग राजने शैलेंद्रना विचारलं "क्यों कविराज , कुछ समझे ? " शैलेंद्र म्हणाले हो , चांगली आहे कथा . पण राज म्हणाला "नही..  और बताओ , क्या समझ में  आया ?" शैलेंद्र एकदम म्हणाले "बेचारा गर्दीश मे  था , पर आसमान का तारा था , आवारा था ।" .. हे ऐकून अब्बासनी एकदम चमकुन पाहिलं आणि विचारलं "राज , हा नक्की कोण आहे ? नीट ओळख करून दे . माझ्या अडीच तासांच्या कथेचं  सार ह्याने एका वाक्यात सांगितलं " अश्यारितीने अजून एका अजरामर शीर्षक गीताचा जन्म झाला. शैलेंद्रनी तर पुढे अनेक शीर्षक गीते लिहिली , इतकी की त्यांच्यापेक्षा कोणी चांगलं शीर्षक गीत लिहिणारा अजून जन्मलाच नाही . जशी की "बरसात में हमसे मिले तुम सजन.. " , "आवारा हुं ... " , "सबकुछ सिखा हमने , ....... ,सच है दुनियावालो के हम है अनाड़ी... " , "चाहे कोई मुझे जंगली कहे ... " , "मेरे नाम की गंगा और तेरे मनकी जमुना का ... संगम होगा की नाहि ... " , "भैया मेरे राखी के बंधन को निभाना ... छोटी बहेन  को ना भुलाना ... " , "हम उस देस के वासी हैं जिस देस में गंगा बहती हैं ... " , "दिल अपना और प्रीत परायि , किसने हैं ये रीत बनायी ... " एकाच वाक्यात सांगायचे तर , हि वॉज किंग ऑफ टायटल सॉंग .

शेलेंद्रचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोपे बोल , पण गहन अर्थ मांडणारे तरीहि गेयता असलेलं गीतलेखन. आता हेच उदाहरण घ्या ना , लोकशाहीचे अगदी सोपं वर्णन करणारं हे  गाणं "होंगे राजे राजकुंवर , हम बिगड़े दिल शहजादे , हम सिंघासन पर जा बैठे , जब जब करे ईरादे ... " थोडीशी  डावी विचारसरणी असलेली त्यांची लेखणी सामाजिक विषमता , दारिद्रय , शोषण ह्याविषयी कायमच हळवी राहिली आणि ते त्यांच्या गीतांमधून , कवितेमधुन हे विषय घेऊन लिहीतच होते . लहानपणी वाट्याला आलेला संघर्ष , गरिबी ते कायम पडद्यावर मांडायचे . अगदी श्री ४२०चे हे गाणे "छोटे से घर के गरीब का बेटा , मै भी हुं माँ के नसीब का बेटा , रंज  और गम बचपन के साथी, आँधीयो में जली जीवनबाती , भूख ने बड़े प्यारसे पाला  ... दिल का सुने दिलवाला .. " घ्या किंवा , दूर गगन की छावमे मधलं हे " कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन " घ्या . तसंच   सरळ आणि सोपे शब्द वापरुन जीवनविषयक सूत्र सांगणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली . सीमा मधलं " तू प्यार का सागर है , तेरे एक बुंद के प्यासे हम ... " किंवा बंदिनी मधलं "ओ जानेवाले हो साके तो लौट के आना " .. आणि अनाडी मधल्या सबकुछ सिखा हेमने मधला  हा अंतरा घ्या " असली नकली चेहरे देखे , दिल पे सौ सौ पहेरे देखे , मेरे दुखते दिल से पुछो , क्या क्या ख्वाब सुनहरे देखे, तूटा जिस तारें पर नज़र थी हमारी  , सबकुछ सिखा हमने ... " , तिसरी कसम मधलं "सजन रे झूठ मत बोलो , खुदा के पास जाना है , ना  हाथी हैं ना घोड़ा हैं , वहा पैदल ही जाना है | " किती किती उदाहरणं द्यायची.

एकाच शेलेंद्रमध्ये अनेक कवी वास करून होते , एकीकडे क्रान्तीची कविता , जीवानातल्या अनेक कटू प्रसंगातून गेल्यामुळे जीवनविषयक निराळीं दृष्टी असलेली कविता तर त्याच वेळेस अतिशय हळुवार अशी प्रेमगीत असलेली कविता . प्रेमगीताच म्हणायची झाली तर यहुदी मधलं "येह मेरा दिवानापन  है , या मोहोब्बत का सुरुर ... " , मधुमती मधलं " दिल धडक धडक के केह रहा है आ भी जा , तुम्हारी हो चुकी है मै ... " , चोरी चोरी मधलं "ये रात भीगी भीगी ,ये मस्त समाये ... " , काला बाजारचं  (हे गाणं जे काडेपेटीच्या तालावर सुचलेलं शीघ्रकाव्य )"खोया खोया चांद , खुला आसामां ... " , आणि पडद्यावरचे सर्वोत्तम प्रेमगीत "प्यार हुआ इकरार हुआ है , प्यार से फिर भी डरता है दिल ... " आणि त्यातलीच ही अजरामर झालेली ही ओळ "हम ना रहेंगे , तुम ना राहोगे , फिर भी रहेगी निशानिया .... " .

एवढंच नाही तर नवं नवे शब्द वापरूनही गाणं लिहिण्याचा देखील त्यांना नाद होता  , उदा. "जिंदगानी" , हा आधी कधीच न वापरलेला शब्द . नेहेमीचे  शब्द म्हणजे  जीवन , जिंदगी . पण जिंदगानी हा अतिशय गेय शब्द वापरून लिहिलेलं  श्री ४२० चं "मुड मुड के ना देख मुड मुडके , जिंदगानी के सफर मी तू अकेला ही नही है ... " किंवा आह मधलं "छोटीसी ये जिंदगानी रे , चार दिन कि जवानी तेरी " ऐका , कानाला किती गोड वाटतं.

जशी शंकर-जयकिशन बरोबर त्यांची जोडी जमली तशीच एस . डी . बर्मन बरोबर ही छान जोडी जमली आणि अनेक चित्रपट त्यांनी एकत्र केले. पण ह्या जोडीचा सर्वोच्च अविष्कार म्हणजे 'गाईड' . खरंतर गाईडची गाणी हा एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे . एकापेक्षा एक सरस अशी ९ गाणी , एकीकडे  "वहा कौन है तेरा , मुसाफिर तू जायेगा कहा ","रामा मेघ दे , छाया दे " सारखं करुण रसातली ,तर दुसरीकडे "गाता रहे मेरा दिल " , " तेरे मेरे सपने ,अब एक रंग हैं " सारखी प्रणयप्रधान गाणी . तसंच सगळी बंधनं तोडून सांगणारं , मुक्त "काटो से खिचके ये आचल , तोड के  बंधन बांधी पायल  ... " तर तसंच विरह रसातली  लागोपाठ येणारी "मोसे छल किये जा " , "क्या से क्या हो गया ". पण सर्वोत्तम हे "दिल ढल जाये हाये , रात ना जाय " .. प्रेमभंगामुळे ,अपेक्षाभंगामुळे उध्वस्थ झालेल्या नायकाच्या मनःस्थिती चे अतिशय परिणामकारक वर्णन करणारं.  माझ्या मते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासांत सर्वोत्तम ५ गाण्यांपैकी एक .ह्या गाण्याचा एक किस्सा .  दिग्दर्शक विजय आनंद , देव आनंद , एसडी , शैलेंद्र असेच एका गाण्याच्या प्रसांगाबद्दल चर्चा करत बसले होते . विजय आनंद सांगत होता नायिका नायकावर रागावलीये आणि त्याच्याशी बोलत नाहीये , त्याला टाळतीये . नायकाला हे सहन होत नाहीये, अत्यंत विमग्न अवस्थेत तो बसलाय. बाहेर पाऊसही  पडतोय .  इथे मला एक गाणं पाहिजे . शैलेंद्रनी डोळे मिटले आणि झरझर शब्द लिहिले

प्यार में जिनके , सब जग छोड़ा और हुए बदनाम 
उनके ही हाथों , हाल हुआ ये,बैठे है दिल को थाम , अपने कभी थे अब हैं पराये 

नंतर येणारं हे कडवं

ऐसी सी रिमझिम,ऐसी फ़ुहारें , ऐसी ही थी बरसात ,
खुद से जुदा और जग से पराये , हम दोनो थे साथ , फिर से वो सावन अब क्यों ना आये 

मग शेवटचं कडवं , अक्षरश: काटा आणणारं

दिल के मेरे, पास हो इतने , फिर भी हो कितने दूर 
तुम मुझसे , मई दिलसे परेशां , दोनों हैं मजबूर , ऐसे में किसको कौन मनाये 

आणि सगळ्यात शेवटी लिहिलेला हा मुखडा 

दिन ढल जाएं , हाये रात ना जाय 
तू तो ना आये तेरी याद सत्ताये , दिन ढल जाएं

सलाम त्या शैलेंद्रला आणि रफीला . कधीही हे गाणं ऐकलं आणि आपली कुठलीशी एक  हळवी आठवण जागी झाली नाही असं होत नाही . कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही कि हे आख्ख गाणं शैलेंद्रनी अवघ्या अर्ध्या तासात लिहिलंय. हेही शैलेंद्रचं एक वैशिष्ठ्य . कधी कोणतीच अडचण त्यांना गीत लेखनापासून रोखू शकली नाही .एकदा लिहिता लिहिता त्यांच्या पेनामधली शाई संपली , दुसरं पेन जवळ नाही , तर खाली पडलेल्या १०-१२ काडेपेटयांच्या जळालेल्या काड्या उचलल्या आणि सुपरहिट गाणं लिहिलं "ए मेरे दिल कही और चल , गम की दुनियासे दिल भर गया , ढूंढ ले अब कोई घर नया... ".

शैलेंद्रनी नुसत्या चित्रपट गीतच  नाहीत  , तर अनेक गैरफिल्मी  कविता सुद्धा लिहिल्या ज्या कधी प्रकाशित झाल्याच नाहीत. त्यामुळेच त्यांना जसा साहिर , कैफी आझमी सारखा सरकार दरबारी कधीच सन्मान मिळाला नाही , ह्याचं खूप दुःख वाटतं . समाजाने सुद्धा थोडीसुद्धा परतफेड केली नाही ह्याच राहुन राहुन वाईट वाटतं .

अश्या ह्या शेलेंद्रनी पडद्यावर एक कविता जिवंत करण्यासाठी जीवाचं रान केलं, आपलं सर्वस्व अर्पुन  एक काव्यात्मक कथा पडद्यावर जिवंत केली .... 'तिसरी कसम ' .  बिहारचे सुपुत्र फणीश्वरनाथ 'रेणू ' ह्यांनी एक कथा लिहिली 'मारे गये गुलफाम ' , जी शेलेंद्रनी वाचली आणि लगेच रेणूंना एक चिठ्ठी लिहिली आणि ह्या कथेवर चित्रपट करण्याची परवानगी मागितली . रेणूंनी  होकार देताच शैलेंद्रनी त्यांना १०,०००/- रुपये देऊन हक्क विकत घेतले आणि रेणूंना चित्रपटाच्या पटकथा लिहायला सांगितली. ही १९६० सालाची गोष्ट . चित्रपटाच्या नायकासाठी राज कपूर सोडता कोणी दुसरा कोणी डोळ्यापुढे येणं शक्यच नव्हतं . राजनेही होकार दिला पण दिग्दर्शन करण्यास असमर्थता व्यक्त केली कारण तेव्हा तो दुसर्या चित्रपटात व्यस्त होता . नायिका म्हणुन वहिदा रेहमान नक्की झाली . दिग्दर्शकाचा शोध बासु भट्टाचार्यापाशी संपला . मोठ्या उत्साहात चित्रपटाचा मुहूर्त झाला . शैलेंद्रचा पहिलाच चित्रपट म्हणून सगळ्या चित्रपटसृष्टीने खूप कौतुक केले . पण ह्या ना त्या कारणामुळे चित्रपट रखडत गेला , तब्बल ५ वर्ष झाली तरी चित्रपट पूर्ण होत नव्हता.खूप लोकांनी त्यांना फसवलं .  खर्च ४-५ लाखांवरून २५-२६ लाखांवर गेला. फिल्म एडिट करायला सुद्धा पैसे उरले नव्हते . ते अखंड कर्जात बुडालेले होते , पण त्यांना फिल्मच्या चालण्यावर खूप विश्वास होता . त्याच वेळेस रेणू देखील आजारपणामुळे त्यांच्या मूळगावी परतले आणि शेलेंद्र एकदम एकटे पडले . शेवटी कशीबशी फिल्म पूर्ण झाली, खरंच दृष्ट लागावी अशी झाली होती . गाणी तर एका पेक्षा एक . बैल गाडीवान हिरामण आणि नाचणारी हिराबाई ह्यांच्यामधल्या अव्यक्त आणि असफल प्रेमाची कहाणी . राज आणि वहिदा दोघांनी जीव तोडुन कामं केली . पण ही फिल्म सर्वसामान्य लोकांसाठी नव्हतीच . वितरकांनी हात आखडता घेतला , कोणीच फिल्म रिलीज करायला तयार नव्हते . लावलेली सगळी पुंजी अक्षरश: मातीमोल झाली होती. ह्या धक्क्यातून शैलेंद्र सावरलेच नाहीत . शेवटी एक दोन वितरक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फिल्म रिलीज करायला तयार झाले. आपली फिल्म मोठ्या पडद्यावर बघणे , प्रीमिअर शो करणे हे स्वप्नचं राहिले . ३ डिसेंबर १९६६चा दिवस . स्वतःला कसंबसं सावरुन शैलेंद्र राज कपूरला भेटायला गेलें . दोघेही नुसतेच एकमेकांकडे बघत नुसते गप्प बसून राहिले , निःशब्द . शेवटी मृतवत मनाने ते घरी आले , आता जगावंसं वाटत नव्हतं . एवढी हार कधीच झाली नव्हती . ह्या दिवसापासून त्यांनी कोणाशीही बोलणंच टाकलं . आतल्या आतच घुसमट वाढत होती. १३ डिसेम्बरची सकाळ  , शैलेंद्रची अस्वस्थता वाढतच चालली होती . शेवटी शाकुन्तलानी राज कपूरला फोन लावला , त्याने लगेच शैलेन्द्रना डॉक्टर कपूरकडे न्यायाचा सल्ला दिला. हॉस्पिटलमध्ये निघालेच होते , वाटेत शैलेंद्रना वाटलं एकदा राज कपूरला भेटून घ्यावं . दोघं भेटले , भरपूर गप्पा झाल्या. राजने विचारलं "अरे ते .. जीना यहा , मरना यहा , इसके सिवा जाना कहा .. कधी पूर्ण करतोयस ?" राज तेव्हा 'मेरा नाम ज़ोकर' मध्ये व्यस्त होता. शैलेंद्र हसून म्हणाले " कल का तमाशा निपटालू , तभी पूरा कर लूंगा... " दुसऱ्या दिवशी राज कपूरचा वाढदिवस होता आणि नेहेमीप्रमाणे त्याची जंगी पार्टी . शैलेंद्रचा इशारा ह्याच गोष्टीकडे होता. नंतर मग हॉस्पिटलला पोहोचले , डॉक्टरनी लगेच ऍडमिट केलं . कशीबशी रात्र सरली . दुसर्या दिवशी सकाळपासुनच त्यांना राजला भेटून त्याचे अभिष्टचिंतन करावेसे वाटत होतं , पण डॉक्टर सोडायला तयार नव्हते. राजची पत्नी कृष्णा आणि गायक मुकेश त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होते . तिकडे आर के स्टुडिओ मध्ये शैलेन्द्रना बरं वाटावं म्हणून विशेष पुजा , हवन चालू होतं. शेवटी दुपारी १२ नंतर शैलेंद्रनी अखेरचा श्वास घेतला , डोळे कायमचे मिटले . वणव्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली . कोणाचा विश्वासच बसेना . एवढा उमदा कलाकार असा अचानक कसा काय निघून जाऊ शकतो . राज कपूर तर अगदी पुतळ्यावत बसून होता , जणुकाही त्याचा आत्माच निघून गेला होता . शेलेंद्रच्या घरी पोचल्यावर तर त्याची अवस्था कोणालाच बघवत नव्हती . शेलेंद्रच्या मृत शरीरापासून दूर हटायलाच तयार नव्हता हा त्यांचा जिवलग मित्र. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच शैलेंद्रचे असं निघून जाणं त्याला सहनच होत नव्हतं . ह्यानंतर आपल्या प्रत्येक वाढदिवसाला हमसून हमसून रडत शैलेंद्रची आठवण काढल्याशिवाय त्याचा दिवस जात नसे. काही दिवसांनी धर्मयुग मासिकात राजने शैलेंद्रवर एक लेख लिहिला , त्यात त्याने म्हटलं " माझं शरीर आर के स्टुडिओंत होतं , पण आत्मा तर शैलेंद्र बरोबर निघून गेला होता ." योगायोगाची गोष्ट म्हणजे शैलेंद्रने लिहिलेलं शेवटचं पूर्ण गीत म्हणजे " हम  तो जाते अपने  गाव , अपनी राम राम राम....  " काय न्याय म्हणावा देवाचा , शैलेंद्रच्या मृत्यूनंतर विताराकांनी 'तिसरी कसम ' विकत घेतली आणि फिल्म भारतभर रिलीज केली, भरपूर पैसे कमावले . एवढंच नाही तर चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला . हे यश राज , वहिदा , रेणू सगळ्या सगळ्यांनी बघितलं , पाहायला नव्हते तर ते फक्त शैलेंद्र . त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "पथ भूला इक मुसाफ़िर, लेके मेरा मन दूर चला , बिखरे सपने,  रह गयी यादें , रात से पहले चाँद ढला .... "

-----------------------------------
जाता जाता --- जीना यहा , मरना यहा , इसके सिवा जाना कहा हे गाणं अर्धवटच राहिले होतं , अनेक गीतकारांनी ते पूर्ण करायाचा प्रयत्न केला , पण राज कापुरना कोणतंच पसंत पडत नव्हते. शेवटी शैलेंद्रचाच  मोठा मुलगा शैली शैलेंद्रने ते पूर्ण केल , जे राजना पसंत पडले. आज जे आपण पूर्ण गाणं  ऐकतो ते शैलेंद्रचे नाही.

संदर्भ ---
आंतरजाल .
आतापर्यंत वाचलेले , लक्षात राहिलेले लेख आणि किस्से .
































Comments

Popular posts from this blog

सफर जंगलाची !!!

श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय

श्री सो.डी.माहात्म्य